काही गोष्टी, काही गमती ........

Wednesday, September 14, 2005

अशी वादळे येती - भाग १: शब्दांची चकमक

काही दिवसांपूर्वीच एका संभाषणात "त्सुनामी" हा विषय निघाला. कुणीतरी एक प्रश्न विचारला की "त्सुनामी" ला मराठी प्रतिशब्द कुठला? मी जरा डोक्याची खाजवाखाजव केली; पण खरंच, मला "त्सुनामी" ह्या अर्थाचा बोली भाषेत "भली मोठी प्रचंड लाट" ह्याखेरीज दुसरा कुठलाही शब्द आठवला नाही (तुम्हाला माहित असेल तर सांगा). खरं तर बोली भाषेत तेच शब्द वापरले जातात जे खरंच बोलण्यात असतात; आणि बोलण्यात ते शब्द असतात जे अनुभवात असतात. त्सुनामी हा शब्द जपानी भाषेतून येतो. जपान ह्या देशाच्या समुद्रकिनारी त्सुनामी नाविक रंभा, मेनका नेहेमीच नृत्यथैमान घालत असतात. त्यामुळे त्यासाठी तसा विशिष्ट शब्द वापरात येणे हे साहाजिकच आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र असला प्रकार क्वचितच(गरीबाच्या घरी कसल्या हो रंभा आणि मेनका?). त्यामुळे मूळ मराठीतून ह्यासाठी बोली शब्द प्रचलित नसावा...

हीच गोष्ट चक्रीवादळाची. आपल्याकडे वापरात असणार्‍या "चक्रीवादळ" ह्या शब्दाची शक्ती वादळ हे खरोखर केवढ्या प्रचंड जोमाचं असू शकतं हे सांगायला हास्यास्पद रित्या अपुरी पडते. अमेरिकेतल्या "टोर्नाडो" पुढे चक्रीवादळाची काही बातंच नाही. आपले चक्रीवादळ नटूनथटून मिरवत जरी टोर्नाडोसमोर गेले तरी टोर्नाडो ढुंकूनसुद्धा बघणार नाही असा ह्या दोघांच्या शक्तीमधला फरक! एरव्ही आपल्याकडच्या वादळाची शक्ती पण फार तर केवढी असते? त्यासाठी "चक्रीवादळ" हे नाव पुरेपूर योग्यच आहे. याला दुसरे नाव आहे 'चक्रवात'. पण ते देखील तुलनेने वात झाल्यासारखेच फरफटत फिरते आहे असे वाटते.

मग आली मराठी वावटळ. शब्दसाधर्म्याने वावटळ हा प्रकार चक्रवातापेक्षा गावातल्या भूताप्रेतांशीच जास्त जवळचा संबंध असल्यासारखा वाटतो. लहानपणी मला वावटळ म्हणजे हडळीची माय असे वाटायचे. तसेच हडळ ही लुगडं घालून फिरत असावी असाही मी तेव्हा निष्कर्ष काढला होता. लहानपणी मी भूताला फार घाबरायचो. पण अजूनपर्यंत एकही दिसला नाही (किंवा दिसली नाही - भूतामध्ये लिंगभेद असतो का? हा प्रश्न मला अजून सुटलेला नाही). त्यामुळे माझा भूताखेतांमधील विश्वास आता उडत चालला आहे. असो!

शहरातल्या साहेबी थाटातल्या टोर्नाडो समोर चक्रीवादळ आणि वावटळ हे गावंढळ बंधूभगिनींसारखे वाटतात. मोठमोठे मालवाहू ट्रकं उचलून फेकण्याची हिंमत असलेल्या टोर्नाडोचे शक्तिप्रदर्शन आपल्या मराठी भूमीत कुठे? नाही तर "चक्री" सोडा, "चक्रावादळाचा बाप" ह्या अर्थाचा कुठला तरी शब्द बोली मराठीत नक्की 'मौजूद' असता! 'बोली मराठी' ही येथील किल्ली आहे - हिचा उल्लेख संस्कृत भाषेचा उपयोग करून कुठलाही नवा जोडशब्द शोधून काढणार्‍या 'संधीसाधू' महाशयांची फक्त खोड मोडावी म्हणून केला आहे, इतकेच! तरीही चादरीसारख्या साध्या गोष्टीला महावस्त्र असले भरजरी नाव असणार्‍या पुणेरीतून आणखी अस्सल शब्दे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केवळ स्पष्टिकरणार्थ म्हणून सांगतो, प्रलय (ख्रिश्चन लोकं ज्याला "ज़ज़मेंट डे" म्हणतात) ह्या शब्दाचे काम इथे मुळीच नाही. संपूर्ण जगाला एका दमात देशोधडीला लावण्याचे सामर्थ्य असणाऱ्या ह्या कारस्थानाचे दर्शन न झालेले बरे. प्रलय हा शब्द आपल्या जगाच्या विनाशाच्या कल्पनेतून उद्भवतो. ज्याने प्रलय प्रथमदर्शनी पाहिला आहे असा कुणी जिवंत नाही आणि प्रलय पाहिल्यानंतर ते सांगण्यासाठी कुणी जिवंत सुद्धा राहणार नाही असा माझा कयास आहे. नाहीतर तो प्रलय हो कसला?

क्रमश:

भाग २
भाग ३
भाग ४

2 Comments:

At Thursday, September 15, 2005 8:24:00 AM, Blogger Shailesh S. Khandekar said...

अप्रतिम् !

 
At Friday, January 12, 2007 7:04:00 AM, Anonymous Manasi said...

Tusnami sathi shabd "Vat lavanari Lat"

 

Post a Comment

<< Home