मोलकरीण

आम्ही अमेरिकेला आल्यापासून आमच्या लहान अपार्टमेंट किंवा टाऊनहाऊस मध्ये राहत असता कधी मोलकरीण बोलवायची गरज पडली नव्हती. आमच्या छोट्याश्या टुमदार घरात स्वच्छता ठेवण्यासाठी मला आणि माझ्या पत्नीला  काही जड जात नव्हते. दोघेच असल्यावर हे सगळं आटोक्यातलंच. पण आम्हाला जेंव्हा पहिली मुलगी झाली त्यानंतर जागा अपुरी पुरते म्हणून आम्ही मोठं बेसमेंटचं घर घेतलं आणि आता मुलांमुळे स्वच्छता हा सहज सुलभणारा प्रश्न उरला नाही. 

एका मध्यमवर्गीय अमेरिकन घरास पुणेकर किंवा मुंबईकरांसारखी पूर्णवेळ मोलकरीण ठेवणे हे काही परवडणारे नसते. वरनं माझ्या एका पुण्यात राहणाऱ्या मित्राच्या घरी घडलेली मोलकरणीची व्यथा मी काही विसरलो नव्हतो: माझ्या मित्राच्या पूर्ण कुटुंबाला लगबगीत एका आठवड्याकरिता शहराबाहेर जावे लागले आणि परत आल्यावर मोलकरणीने त्यांना त्यावेळचा पूर्ण  पगार मागितला कारण "शहराबाहेर ते सगळे गेले होते मोलकरणीला न सांगता, मोलकरीण थोडेच त्यांना न सांगता गेली होती - तिने तर न चुकता रोज त्या दिवसांत घराची खेप टाकली होती ना!"  असो.  (समोर काय झाले हा आपला विषय नाही!) देशातल्या मोलकरणींच्या इतर कथा सांगतासांगता हा लेख संपून जाईन आणि आपला मूळ "अमेरिकेतल्या मोलकरणींचा" विषय राहून जाईन म्हणून गाडी रुळावर आणतो. तर जेव्हा गरज पडेल तेंव्हाच मोलकरणीला कामापुरते बोलवावे असे आम्ही ठरवले. 

काही मोलकरणींचा अनुभव आल्यानंतर आम्ही एका स्वच्छता कंपनीवर ठप्पा मारला.

इंग्रिट:
ठरलेल्या अपॉइंटमेंटच्या वेळी मेक्सिकोमधून स्थलांतरित झालेली इंग्रिट तिच्या चार कामगार बायांना घेऊन यायची आणि अडीच ते तीन तासांमध्ये आमचं पाच बेडरूम आणि चार बाथरूम असणारं घर स्वच्छ करून टाकायची.  पहिल्या वेळेसची साफसूफ फारंच छान जमली. आम्ही अगदी इम्प्रेस्ड!   मग दर महिन्याच्या महिन्याला आम्ही इंग्रिटलाच घरी स्वच्छकामासाठी बोलावू लागलो. हळूहळू इंग्रिट तिच्या लहान मुलींना सुद्धा सोबत घेऊन येऊ लागली - त्यांना उगाच डेकेअरला कशास ठेवायचे म्हणून. मला नंतर कळले इंग्रिटच्या काही कामगार तरुणी ह्या तिच्या मोठ्या मुलीच होत्या. पाच मुलिंची आई इंग्रिट तिची "मेड कंपनी" फॅमिली मेंबर्सना घेऊन अगदी जोरात चालवत होती. माझ्या पत्नीने तिला एखादेवेळेस तिच्या मोठ्या मुलींना कामाला सोबत आणण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणाकडे जास्त भर देण्यास सांगितले असावे. त्यावेळेस इंग्रिटने स्वच्छता व्यवसायच कसा त्यांच्याकरिता योग्य आहे आणि पुढील शिक्षण काय कामाचे असे आम्हालाच पटवून दिले. 

हे इंग्रिटच्या दृष्टिकोनातून कसे योग्य होते ह्याची प्रचीती मला लवकरच आली. 

काही महिन्यानंतर मी असाच ऑफिसवरून परत आलो असता मला आमच्या ड्राइव्हवेमध्ये एक भलीमोठी "हमर ३" गाडी उभी दिसली. मी आपला कसाबसा मिलिटरीमध्ये जन्मास आलेल्या त्या गाडीच्या भारदस्त छायेमध्ये आपल्या टोयोटाला लावून उतरलो.  मनातल्या मनात "कुणी मोठ्ठे स्थानिक पॉलिटिक्स मध्ये वावरणारे दिग्गज आपल्या घरी काय काम घेऊन आलेले असणार" म्हणत घराचे दार उघडले आणि बघितले तर घरात "इंग्रिट कंपनीची" जोरात साफसफाई सुरु होती! इंग्रिटचा स्वच्छता व्यवसाय फारच प्रगती करणारा वाटला. 

भारतात लोकांना सांगितलं की  येथील मोलकरणी अगदी फोरव्हीलरमध्ये फिरतात तर त्यांना खरंच अप्रूप वाटतं . तेव्हा त्यांना मुर्खात काढल्यासारखं आपणंच त्यांना सांगतो की "अरे! इकडे अगदी गरीबातल्या गरीब लोकांकडे सुद्धा गाड्या असतात!" - कारण फारशी न्यूयॉर्क, शिकागो, लॉस अँजेलिस सारखी मोठी पसरलेली शहरे सोडली (जिथे बरेच लोकं सार्वजनिक बस आणि रेल्वेचा वापर करतात) तर बाकी सगळ्या ठिकाणी पोटापाण्यासाठी फिरण्याकरीता गाड्यांशिवाय गत्यंतर नसतं. माझ्या मध्यमवर्गीय गाडीपेक्षा "पाच" पटीने महाग असणारी गाडी घेऊन ही मोलकरीण बया आपल्या मुली आणि बहिणींना घेऊन स्वच्छता कामाला जात होती - हे कोडे मी बापडा आपल्या देशातल्या लोकांना कसं समजावून सांगणार?

ह्या प्रगतीनंतर मात्र इंग्रिट कंपनीच्या कामाची क्वालिटी घसरली आणि माझ्या पत्नीने तिच्या मैत्रिणींकडे दुसऱ्या मोलकरणीच्या शोधास गळ घातली.

अटलांटामधील मराठी बायकांचं नेटवर्क फारच जबरदस्त आहे म्हटले तरी कमीच पडेल! लगेच आम्हाला नव्या मोलकरणीची माहिती मिळाली आणि आम्ही "बाहरा" ला फोन लावला.  
  
बाहरा:
बाहरा म्हणजे फारच निराळे व्यक्तिमत्व निघाले. आमच्या घरास स्वच्छ ठेवण्यासाठी ती जणू देव म्हणूनच आली. पुरातन काळातील कथांमध्ये  वेगवेळ्या गोष्टींकरिता कोणी ना कोणी देव नेमलेला असतो; तसंच जर स्वच्छतेकरिता कोणी देव किंवा देवी नेमली असेल तर ती म्हणजे साक्षात बाहरा! मी का बरे असं म्हणतोय ते तुम्हाला कळेलंच. 

पहिल्या वेळेस बाहरा आली ती एकटीच. युरोपमधील बोस्नियातून स्थलांतरित झालेली बाहरा अंगकाष्टीने उंच पण बारीक आणि अमेरिकेच्या कामगारांच्या साधारण मापापेक्षा कमीच होती. आम्हाला वाटलं कि हि बया तिच्या संगतीला आणखी कामगारांना घेऊन येईल - त्याशिवाय ही कसंकाय एकटी संपूर्ण घर वेळात स्वच्छ करणार हे आम्हाला एक कोडंच पडलं. त्यावरून तिने आम्हाला सांगितलं कि "पहिल्यावेळी आपल्याला घराचे डीप क्लीन करावे लागणार!".  मी आपला मनात, 'बाई, प्रथम साधी सफाई तर करून दाखव. डीप क्लीनचं नंतर बघू या!'.  

सुरुवातीला बाहराने स्वयंपाकघर स्वच्छ करायला घेतले. दोन तास झाले तरी तिची स्वयंपाकघर स्वच्छता मोहीम सुरूच होती. एकेक कानाकोपरा शोधून शोधून त्यावर ती अगदी मन लावून काम करत होती. आपण स्वतः ज्या काळजीने ते कोपरे स्वच्छ करणार नाही तेवढ्या प्रेमाने एक घराबाहेरचं माणूस काम करतंय हे बघून आमचं तोंडंच उघडं पडलं. मग मात्र आम्हाला कल्पना आली कि हे काम काही तासांचं नसून तर अख्ख्या दिवसभराचं आहे. मग आम्ही अधूनमधून "काय गं, तुला काही खायला देऊ काय?", "तुला कॉफी बनवून देऊ काय?" वगैरे प्रश्नांनी तिला भांबाऊन सोडले. दिवसभर फक्त दोन कॉफीचे कप घेऊन आणि काहीही खायचे दिलेले नाकारून काम करणाऱ्या बाहराकडे बघून आम्हालाच कसेतरी वाटू लागले. शेवटी तिला नमस्कार करून ठरल्यापेक्षा पंचेवीस-तीस डॉलर्स जास्त देऊन तिला आम्ही मोकळे केले. त्यादिवशी सकाळी दहा वाजता आलेली बाहरा रात्री आठ वाजता परत गेली - पूर्ण घरातील कोपरे, खिडक्या इत्यादी ठिकाणे अगदी अपेक्षेपलीकडे स्वच्छ करून. 

मग हा नित्याचा दर दीड-दोन महिन्याचा कार्यक्रम सुरु झाला. पुढच्या काही वेळेला भारतातून काही महिन्यांकरिता आलेल्या माझ्या सासूबाईसुद्धा बाहराच्या कामास पाहून अगदी थक्क झाल्या. "अगं बाई! अशी कामवाली बाई आपल्या भारतात सुद्धा सापडणार नाही!" असा फिडबॅक मिळाल्यावर आमच्या मिसेसला आणखी अभिमान चढला नसता तरच आश्चर्य!

नंतर एकदा बाहराचे काम उरकत असताना मी घरी आलो तेव्हा तिने घरातील फर्निचरची अरेंजमेंटच बदलली होती (पहिला प्रश्न: एवढ्या सडपातळ बाईने एकटीने हे फर्निचर कसे हलवले?). आम्ही बरेच दिवस सगळे सोफे आणि खुर्च्यांची ठेवण बदलायचा विचार करत होतो - पण साक्षात इंटेरियर डिझाइनर सारखी नवीन ठेवण - आणि माझ्या घरातील ऑफिसखोलीमध्येसुद्धा जादूईरित्या जास्त वापरण्यायुक्त जागा पाहून मी आणखीनच इंप्रेस झालो. अशा कित्येक वेळेला प्लेजन्ट सरप्राईज किंवा केलेले काम बघून आम्ही ठरल्यापेक्षा जास्तच मोबदला स्वखुशीने द्यायला लागलो.  बाहराचा येण्याचा दिवस म्हणजे एखादा सणच वाटू लागला. त्यादिवशी कुठेही बाहेर जायचे नाही, काही अगोदर आखलेला कार्यक्रम असेल तर तो रद्द करायचा किंवा (माझ्या पत्नीचे:) "नाही गं! त्या दिवशी जमत नाही - बाहरा येणार आहे." असे प्रकार सुरु झालेत. कधीकधी बाहराला एकटीला काम करताना एवढा उशीर व्हायला लागला कि आम्हीच तिला "जाऊ दे, उरलेलं नको करूस - आम्हीच स्वच्छ करून टाकू" म्हणून किमान रात्री दहा वाजता तरी (आता तरी घरी जा बाई!) सोडू लागलो.  

बाहराच्या स्वच्छतेचा दर्जा कधीच कमी झाला नाही.  पण तिच्या ख्यातीमुळे तिच्या अपॉइंटमेंट्स मिळणे फारच कठीण झाले. आमच्या माहितीतील कित्येक जण बाहरालाच बोलावू लागले. आम्ही त्या मित्रमैत्रिणींना सहज संध्याकाळी घरी जेवायला या असे म्हणून आमंत्रण द्यायला गेलो तर आम्हालाच आता "नाही गं! त्या दिवशी बाहरा येणार आहे!" ऐकायला येऊ लागले. मग आम्ही बाहराला स्वच्छताकामासाठी बोलवत असताना "नाही हो, तुमचे घर काही खराब होत नाही - दर दोन महिन्यात मला बोलवायची काही गरज नाही!" अशी वेगवेगळी कारणं देऊन बाहरा आमच्याकडे येईनाशी झाली. 

अजूनही आम्ही बाहराची नवीन तारीख मिळवण्याची वाट पाहात आहोत; आणि ती जर आलीच तर उगाच गाऱ्हाणे नकोत   म्हणून घर जेवढे जास्त अस्ताव्यस्त आणि अस्वच्छ ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. 

Comments

Popular posts from this blog

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

सावजी

नावात काय आहे?