ऑफिस - भाग १ : अमेरिकन बायका

आजकाल मला ऑफिसला जायची भीती वाटते. म्हणजे एकदमच घाबरलेलो आहे वगैरे प्रकार नाही; फक्त त्या ठिकाणी जायला जरा मनाची तयारी करावी लागते इतकंच.
का विचाराल तर तशी कारणे पण बरीच आहेत. सगळ्यात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे काही अमेरिकन बायका. या बायकांनी माझी झोप उडविली आहे.

गैरसमज करून घेऊ नका; मी ऑफिसमध्ये जाऊन झोपतो अशातला भाग नाही; किंवा, या बायकांसोबत माझी प्रेम प्रकरणे सुरु आहेत असलंसुद्धा काही नाही. या बायकांची कार्यालयीन कक्षे (क्युबिकल) माझ्या कक्षाला लागून आहेत. ह्या कक्षांच्या भिंती ह्या फार तर सहा फुटाच्या उंचीच्या आहेत आणि छत मात्र दहा फूट वर आहे. त्यामुळे ह्या बायका जो काही गोंधळ घालतात तो त्या कक्षेमधून या कक्षेमध्ये सर्रास येण्याला कसलीही आडकाठी नाही.

सर्वप्रथम माझ्याच कक्षाला लागून असलेल्या पलीकडच्या ओळीमधील कक्षेतल्या बाईची गोष्ट. एक मध्यमवयीन, जरूरीपेक्षा जास्त अंगकाठी, घटस्फोट झालेला आणि एका म्हाताऱ्या आईला व किशोरवयीन मुलीला सांभाळण्याची जबाबदारी असलेली ही बाई. पहिल्या दोन गोष्टी सोडून बाकीच्या दोन गोष्टी मला कशाकाय माहित झाल्या असाव्यात याचा अंदाज तुम्हाला समोरच्या लिखाणात येईलंच! हिचा दिवसातून सगळ्यात प्रिय कार्यक्रम म्हणजे टेलिफोनचे पारायण. ऑफिसच्या डेस्कवरचा फोन आणि मोबाईल ह्या दोन्ही गोष्टी हिच्या जिवाभावाच्या आहेत. जर टेलिफोन नामक गोष्ट अस्तित्वात नसती तर ह्या बाईने कधीच आपला जीव देऊन जगाचा निरोप घेतला असता अशी माझी समजूत झाली आहे. तर हिच्या टेलिफोन प्रेमाने माझं काय एवढं बिघडवलंय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो, तेही सांगतो.

या बाईचे मागचे पुढचे सगळेच हिच्या मोठ्या खरखरीत आवाजातील टेलिफोन संभाषणांद्वारे कळते. ऑफिसला आल्यावर हिचा ठरलेला फोन लागतो तिच्या एका मैत्रिणीला. दोघी मिळून आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. वर कुठल्याशा अखंड चालत असणाऱ्या अमेरिकन मालिकेमध्ये घडलेल्या घटनांना आठवून आठवून त्या आठवणींचा चोथा करतात. म्हणजे याने तिच्याशी लग्न का केले नाही, तिने त्याला का बरे लाथाडले? तो तिला का बरे सोडून गेला? असल्या सगळ्या प्रश्नांची शहानिशा होते. मी आयुष्यात या टी.व्ही मालिकेचा चुकूनही एक भाग बघितला नाही. पण मी तुम्हाला त्या मालिकेतील नायक, नायिका पात्रांची नावे, त्यांची लग्ने, घटस्फोटे, त्यांच्या कुठल्या “डेट” कशा गेल्या, कोणाची आजी मरायला टेकलेली आहे, कोणाची बायको कर्करोगाने आजारी आहे, मग त्याचे कोणा दुसरीसोबत कसे संबंध असतात हे सगळे इत्थंभूत सांगू शकतो.

सकाळी काम करायची छान वेळ असते हो. पण ह्या मालिकापुराणामुळे माझं कामात लक्षच लागत नाही. मला अजूनही कान बंद करून काम करायची विद्या अवगत नाही. त्यामुळे ही माझी ठरलेली सकाळची दुविधा असते. म्हणून मी जरा उशिरा कामावर जाणे सुरु केले आहे, जेणेकरून मला सकाळी उठायची गरज नसते. लोकांना विश्वास बसत नाही की माझे रोजचे उशिरा ऑफिसमध्ये येण्याचे कारण मी स्वत: उशिरा झोपेतून उठतो हे नसून ह्या बायकांचे प्रभातकाव्य आहे. ते असो. सकाळचा त्यानंतरचा एक तास ह्या बाया छान काम करतात - सगळं कसं शांत शांत असतं. तीच माझी खरी कामाची वेळ. त्यात काम झाले तर झाले.

एका तासानंतर मात्र ह्या टेलिफोनप्रेमिकेचा नवीन अंक सुरु होतो. महिन्यातील सगळ्या दिवसांपैकी कुठल्या दिवशी कुठले काम काढावे हे तिचे ठरलेले असते. कधी घराच्या डागडुजीची व्यवस्था करण्यासाठी “हॅंडिमॅन” व्यवसायीकांना फोन लागतो. घरात कुठलं दार किर्र वाजतंय, कुठलं भिंतीतलं कपाट हलतंय, बेडरूमच्या खिडकीच्या काचा कशा फुटल्या, तिच्या घराच्या मागे असणाऱ्या हिरवळीतील गवत कापण्यासाठी मजूरांना लागणाऱ्या पैशांपेक्षा स्वत: ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केंस कापून घेणे तिला किती परवडेल असल्या सगळ्या तपासण्या, सुधारणा आणि त्यासाठी वेळ ठरवण्याचा हा कार्यक्रम असतो. कधी हिचा फ्रीज खराब झालेला असतो, तर कधी वॉशिंग मशिनमधून विचित्र आवाज येत असतात - आणि अक्षरशः आवाज कसा येतो त्याचे एक हुबेहूब प्रात्यक्षिक देखील ही बाई त्या फोनवरच्या मेंटेनन्सवाल्याला करून दाखवते. ते प्रात्यक्षिक ऐकून ह्या बाईमध्ये हॉलिवूडमधील सिनेमांमध्ये पार्श्वध्वनी देण्यासाठी लागणारे कौशल्य असताना तिकडे जायचे सोडून ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटची बरबटलेली नोकरी का करते हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. बरे, ह्या मेंटेनन्सच्या वेळा ठरवण्याकरिता जर योग्य कारण नसेल तर मग घरी आदल्या दिवशी आलेल्या सुधारकाच्या कामाचे गुणगाण करण्यासाठी किंवा खरडपट्टी काढण्यासाठी आणखी एका मैत्रिणीकडे फोन केला जातो. मग त्या मैत्रिणीलासुद्धा तिच्या स्वैपाकघरामध्ये कार्य काढायचे असल्यामुळे त्या स्वैपाकखोलीच्या फरशा बदलणाऱ्या उत्तम गवंड्याकडे मैत्रिणीच्या कार्यासाठी वेळ ठरवण्यासाठी फोन करण्याची तसदी घेतली जाते. मोठ्या मोठ्या व्यवसायीकांचा धंदा चालतो की बुडतो हे प्रामुख्याने ह्या बाईच्या शिफारशीवरूनच ठरवल्या जाते.

आणखी एक तापाची गोष्ट म्हणजे पलीकडच्या ओळीतल्या त्या बाईची एक मैत्रिण माझ्या अलीकडच्या ओळीत आहे. मी आहे आपला दोघींच्या मध्ये. या दोघींना एकमेकांशी बोलायला एकामेकांच्या कक्षेत जाणे जमत नाही. माझी शेजारणी तिला फोनवरच “अगं त्या नॅन्सीचं काय झालं माहिती आहे का?” असल्या विषयावर चर्चा करण्यासाठी साकडं घालते. मी मध्ये असल्यामुळे मला दोन्ही बाजू ऐकणे भाग पडते. जर तुम्हाला कुठल्या माणसाला मोठी शिक्षा द्यायची असेल, तर मी माझा कक्ष त्याच्यासाठी खाली करून द्यायला एका पायावर तयार आहे. एका दिवसात तो मनुष्य स्वतःचे कान कापून तुमच्या पायाशी लोटांगण घालतो की नाही हे बघाच!

दुपारच्या वेळेला शाळेतून परत घरी आलेल्या हिच्या किशोरवयीन मुलीची विचारपूस करण्यासाठी घरी जातपर्यंत थांबणे मात्र फार कठीण होत असावे. त्यामुळे दुपारीच फोन करून, घरी व्यवस्थित पोहोचली काय? आज शाळेत काय झाले, कुठला होमवर्क मिळाला, कुठल्या विषयात किती गुण मिळाले, त्यावर आणखी; गुण कमी का मिळाले? अभ्यास बरोबर करत नाही, मूर्खपणा कधी सोडशील, संध्याकाळी काय पाहिजे स्वैंपाकात, वगैरे वगैरे सवालजवाब होतात. तिच्या घरातील कन्यापुराण इथपर्यंतच मर्यादित राहात नाही. ती मैत्रिणींशी फोनवर बोलताना बऱ्याच तपशीलवार गोष्टी ऐकण्यात येतात. मला आता माहिती असणाऱ्या गोष्टींमध्ये तिच्या मुलीचे वय काय, मुलीचे नाव काय, मुलगी कितव्या इयत्तेत शिकते, मागच्या वर्षी एका विषायात मुलीला पैकीच्या पैकी मार्क मिळता मिळता कसं काय राहून गेलं, मुलीची पहिली “डेट” कशी झाली, दोघी मायलेकींचा आवडता टी.व्ही कार्यक्रम कोणता, येणाऱ्या आठवडी सुट्टीला कुठल्या जत्रेत जाणार आहेत, मदर्स डे साठी मुलगी आईसाठी काय भेट घेण्याचा विचार करते आहे आणि ते त्या आईला कसे गुप्तरित्या माहिती झाले, दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या बापबेटी भेटीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुलगी पुढच्या वीकेंडला तिच्या आईपासून विभक्त वडिलांसोबत कुठल्या ऑपेराच्या कार्यक्रमाला जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची भर पडली आहे.

बरे, आजतागायत चाललेले हे पुराण रोज नवे रूप धारण करत असे. रोज नवनवीन विषय चर्चिले जात. त्यामुळे कंटाळा येत नव्हता. पण इतक्यात एक नवीन गोंधळ सुरू झाला होता. ह्या माझ्या शेजारणीने नुकतीच युरोपची सहल आपल्या मुलीसोबत फत्ते केली होती. त्यामुळे बाकी साऱ्या विषयांना कलाटणी मिळून फक्त युरोपमधील स्कॉटलंड आणि इंग्लंड येथील प्रवासवर्णनाची पारायणे सुरु होती. त्यांत दिवसांतून कमीत कमी तीन नवीन मैत्रिणींना फोन करून युरोपची सहल कशी झाली याची कदा-न्-कदा माहिती पुरवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये लंडनचे पाऊंड ह्या चलनामध्ये विकत मिळणारे फास्ट फूड किती महाग आहे, स्कॉटलंडची एक झुकझुकगाडी कशी दऱ्याखोऱ्यातनं जाते आणि त्या गाडीमधून दूर खाडी दिसत असतानाचा देखावा किती सुंदर असतो, हॉटेलच्या रिजर्वेशनचे काय लफडे झाले, लंडनमध्ये बसचा कुठला पास घेतला, आमच्याच ऑफिसातील एका गृहस्थाची अचानक कशी तिथे गाठभेट पडली इत्यादींचा तपशील तर होताच, पण त्यासोबत दोघी मायलेकी कशा एकामेकांच्या जवळ आल्या आणि कसे नवीन जिवाभावाचे बंध तयार झालेत वगैरे (माझ्या दृष्टीने) अतिशय वैयक्तिक पातळीवरची माहितीसुद्धा ऐकायला मिळाली. एकदा सांगती तर काही अडचण नव्हती. पण प्रत्येक वेळेस न चुकता सगळा तपशील देणे नित्य सुरु होते. त्यावर कधी कोणी तिच्या कक्षेत येऊन “अरे वा, सहलीवरून परत आलीस वाटतं. कशी झाली सहल?” म्हणून डोकावयाचे. या महाशयांचे काय जाते एकदा ऐकायला? मी आपला तोच तो तपशील अगोदर चाळीसवेळा ऐकून होतो. शेवटी मला ती माहिती इतकी पाठ झाली की जर ती बाई जागेवर नसताना कुणी मला येऊन विचारले असते की ती कुठे गेली तर मी तिची युरोपची सहल कशी झाली हे सुद्धा एकही मजकूर न सोडता संपूर्ण बरळले असते. पण तेच ते ऐकून जाम वैतागलो होतो हे खरे. म्हणून मी काही उपाय करायचे ठरवले. त्यांत मोठ्यामोठ्याने कानात गाणी वाजवण्यासाठी एम.पी.थ्री (MP3) प्लेयर पण विकत घेतला. पण साध्या गाण्यांनी शेजारणीचा आवाज लपत नाही म्हणून धांगडधिंगा गाणी लावावी लागली. असल्या गाण्यांमुळे माझं कामात आणखीन लक्ष लागेना. म्हणजे आजारापेक्षा उपाय भारी अशी पंचाईत झाली. मी अक्षरशः मोडकळीस आलो होतो. आता कुठल्याही क्षणी तिच्या क्यूबमध्ये जाऊन “कृपया आता फोन आवरता का?” असा शिष्ट उपाय करायला मी तयार झालो होतो. तेवढ्यात एक आनंदाची बातमी मिळाली - तिला प्रमोशन मिळाले.

तिला प्रमोशन मिळाले आणि बढतीचा भाग म्हणून तिची कंपनीच्या दुसऱ्या इमारतीमध्ये बदली झाली. तिला मिळालेल्या प्रमोशनचा तिला जेवढा आनंद झाला नसेल त्याहीपेक्षा चौपटीने जास्त आनंद मला झाला होता. मी योजलेल्या शिष्ट उपायाची आता गरज पडणार नव्हती. उलट मी छान हसऱ्या चेहेऱ्याने तिचे बढतीबद्दल अभिनंदन देखील करून आलो.

ती बोलकी बाई तिच्या नवीन ठिकाणी यथासांग स्थलांतरीत झाल्यानंतर माझा कक्ष कसा निवांत वाटत होता. असेच एक दोन दिवस गेलेत आणि काय मोठा घोर झाला हे माझ्या लक्षात आले. माझ्या बोलक्या शेजारणीमुळे तिच्या मागील कक्षात असणाऱ्या “हसऱ्या” बाईशी कधी संबंधच आला नव्हता. पण आता मात्र तिच्या “हसणे” ह्या आवडत्या कार्यक्रमाने माझी पंचाईत केली. तुम्ही म्हणाल हसण्याने एवढा काय त्रास होतो. अहो पण हसणे कसे? दिवसभर “खिदी खिदी खिदी खिदी” आणि त्याला मोठा लाऊडस्पीकर लावल्यानंतर जो काही कानात कलकलाट होतो तो तुम्हाला अनुभवाशिवाय नाही कळायचा. ही बाई फोनवर, किंवा तिच्या कक्षेमध्ये कुणाशी बोलताना वारंवार “खिदी खिदी” हसून छळ करते. मला तिचे बोलणे ऐकूच येत नाही, फक्त मोठ्या आवाजातील “खिदी खिदी खिदी”! मी एक-दोन वेळा तिथल्या कक्षांच्या ओळीमध्ये जाऊन बघितले सुद्धा की कोण हसतंय ते. अहो तिथे तर चार चार बायकांचा घोळ आहे. त्यापैकी नेमकी कोण हे न ओळखता येणाऱ्या त्या हसऱ्या बाईने सगळ्या शेजारणींना तीच सवय लावली आहे. आता एक हसायची थांबली की दुसरीचं “खिदी खिदी” सुरु होतं. वरून मला ह्या बायांपैकी एकीचंसुद्धा बोलणं ऐकायला येत नाही, त्यामुळे “इंटरेस्टिंग” असं काही सुद्धा कानावर येत नाही. म्हणून माझी जास्तच गोची झाली आहे. पहिलेचीच शेजारणी किती बरी होती आणि तिच्यामुळे माझे काय मनोरंजन व्हायचे याची मला आता आठवण यायला लागली आहे. आता मला पुन्हा ऑफिसात जायला भीती वाटायला लागली आहे.

क्रमश:

Comments

Nandan said…
पवन, फार दिवसांनी या ब्लॉगवर लेखमालिका सुरू झालेली पाहून बरे वाटले. पहिला लेख आवडला. पु. लं. चा एक सल्ला उपयोगी पडतो का बघ -'वैताग घालवण्याचं माझं एक तंत्र आहे. शेजारचा रेडिओ ठणाणा करत असला, की ती गाणी माझ्यासाठीच लावली आहेत, अशी मी समजूत करून घेतो. त्यामुळे वैताग कमी होतो.'

असो, तुलादेखील बढती मिळावी आणि पुन्हा एकदा जुन्या शेजारिणीजवळचा कक्ष मिळावा ही सदिच्छा. :)
Pawan said…
शैलेश आणि नंदन,
तुमच्या इतक्या झटकन दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
आणि वैताग घालविण्याचा उपाय चांगलाच आहे की!

शेवटी बढती मिळाल्यावर जुन्या शेजारणीशेजारी कक्ष मिळाला नाही तर बढती स्वीकारायचीच नाही असे आता मी ठरवले आहे.
हाहाहा.. हा भाग वाचल्याने हसून हसून लोटपोट झाले अगदी. आता मला भीती वाटायला लागली आहे की माझ्या सहकाऱ्यांना मी त्या दुसऱ्या बाईसारखी तर वाटायला लागले नाही ना सारखी फिदी फिदी हसणारी म्हणून ! :D तूफान सुंदर आहे सुरूवात.अशाच झकास झडून जाऊ द्या पुढच्या भागांच्याही फैरीवर फैरी..पुढील भाग वाचायला खूप उत्सुक आहे.
Pawan said…
वेदश्री,

तुम्हा सगळ्यांच्या उत्सुकतेमुळे आता मात्र मला पुढचा भाग लिहिण्याची भीती वाटायला लागली
आहे ;-)

तुम्हाला सुरुवात आवडली हे बघून आनंद झाला.

- पवन
पवन सहीच रे ! ROTFL माझ्या शेजारी देखील अशीच एक बाई बसते. कायम फोनवर "हाआआआआअय धिस इज लिलियन " अशी सुरुवात करून बडबड करते. तीची आठवण झाली
आशिष दीक्षित said…
simply सही!
तू खरंच खूप छान लिहितोस! keep it up! शप्पथ सांगतो, मी कधीही एका ब्लॉगवर इतक्या वेळ टिकत नसतो. खूप दिवसांनी निर्मळ विनोद वाचून बरं वाटलं रे. असाच लिहित राहा..
ashish.scribe@gmail.com
Pawan said…
हरीभाऊ आणि आशिष,

तुमच्या दोघांच्याही प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
paamar said…
Wonderful :)
Few months back I became expert in housing loans since a colleague of mine used to quarrel with his bankwala man at the top of his voice on phone !
btw that reminds me, my supervisor used to sing all latest songs, I used to accompany him on whistle and a guy in next cube used to drum on keyboard. सांगायला नकोच की वाढत्या सामाजिक असंतोषामुळे आम्हाला आमची कलासाधना लवकरच बंद करायला लागली :)

Popular posts from this blog

सावजी

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम