अशी वादळे येती - भाग ३: अडचणीत अडचण

अमेरिकेच्या हवामान खात्याचं काम अगदी चोख असतं. वादळ वारा यांना दुरूनच दिसत असतो. जर कुठले वादळ किंवा झंझावात येणार असे ह्या हवामान खात्याने सांगितले की ती दगडावरची रेघ होऊन जाते. तसेच सर्वसाधारणतः ज्यादिवशी पाऊस पडणार असे सांगितले की नव्वद प्रतिशत पाऊस पडणारंच. जेव्हा लख्ख ऊन सांगतात तेव्हा सूर्यही तळपत राहणार. किंबहुना अमेरिकन पाऊस, वारा या गोष्टी अमेरिकन हवामान खात्याला विचारूनच पुढचे कार्य आखत असावेत.

आपल्याकडील वार्‍याचं आपण काही तरी बिघडवलेलं असणार. नाहीतर आपल्या देशीय शासनाच्या हवामान खात्याला हवा कुठल्या दिशेने वाहते याची खरोखरच हवा असती. मराठी बातम्यांमध्ये "आज लख्ख ऊन पडणार" अशी बातमी आली की आमचे देशी शेजारी नेमके त्याच दिवशी छत्री काढत. एकदा "उद्या भरपूर पाऊस" म्हणून दूरदर्शनच्या बातम्यांवरून कळलं. आमच्या शेजार्‍यांनी दुसर्‍या दिवशी छत्री नेलीच नाही. योगायोगाने त्यादिवशी मुसळधार पाऊस पडून शेजारी ओलेचिंब भिजले आणि पुढे आजारी पडले. नंतर बरे झाल्यावर हवामान खात्याच्या कार्यालयात जाऊन त्यांनी "काय लेकहो बेभरवशाचे तुम्ही!" म्हणून जो पहिला सापडला त्याच्या कानाखालीच एक ठेवून दिली. नंतर पोलिसांनी अटक करून त्यांना दम दिला वगैरे वगैरे! (ही गोष्ट शेजार्‍यांनीच आम्हाला सांगितली. खरे खोटे कुणास ठाऊक?) चुकीचे हवामान अंदाज सांगण्यात सुद्धा हवामान खात्याला नियमितता नाही ही आमच्या शेजार्‍यांची अडचण. बरोबर हवामान अंदाज नियमितपणे सांगता येत नाही ही आमच्या हवामान खात्याची अडचण!

अमेरिकेत उन्हाळा अर्ध्यावर उतरला की फ्लोरिडा आणि आजूबाजूच्या आग्नेयी राज्यात राहणार्‍या लोकांना वादळाच्या आगमनाची तयारी करावी लागते. कुठले का वादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली की लोकांची लगबग सुरु होते. लोकं घरात भरपूर आठवड्यांची खानपान आणि इतर सामुग्री आणून आपल्या फ्रीजरमध्ये आणि जेथे होईल तेथे कोंबतात. तळघरात सगळे व्यवस्थित करून कदाचित तिथेच राहण्याची पाळी आली तर तिथे माल भरून ठेवतात. काहीजण वीज (इलेक्ट्रिसिटी) जाईल या भितीने घरात जनरेटर आणून ठेवतात. वादळवार्‍यामुळे येथे विज जाण्याशिवाय आणखी गोष्टींची तयारी असावी लागते - म्हणजे कधी छप्पर उडून जाईल, दारावरचे मोठे झाड कधी बाजूच्या भिंतीतून तळ्यात-मळ्यात खेळायला सुरुवात करेल तर कधी तळघराचं रूपांतर पाण्याच्या टाकीत होऊन जाईल ह्या चिंता!

वीज जाणे ही अमेरिकेतील दुर्लक्ष्य न करता येण्यासारखी घटना आहे. एखाद्या शहरातली वीज गेली तर लगेच त्या दिवशींच्या बातम्यांमध्ये तिचा समाचार घेतला जातो. मग भलेही लॉस एंजेलिस शहराची वीज जावो - त्या घटनेची बातमी २२०० मैल दूर असणार्‍या अटलांटा शहराच्या स्थानिक बातम्यांमध्ये सांगितली जाते. जर मुंबईची वीज गेली तर त्याचा उल्लेख मुंबईच्या स्थानिक बातम्यांमध्ये देखील होतो की नाही हाच प्रश्न आहे! रोज मरे त्याला कोण रडे?

बरे, अमेरिकन माणसाला (किंवा बाईला) घराची वीज जाणे ह्याखेरीज दुसरी मोठी शिक्षा नाही. समजा वीज गेलीच तर कायकाय हाल होतात बघा: वीज नाही म्हणजे फ्रीजर बंद - आठवडाभराच्या खानपानाचे वाटोळे; पाण्याचा विजेवर चालणारा बंब (हीटर) 'थंड' पडल्यामुळे घरातील सगळीकडचे गरम पाणी बंद; डिशवॉशर बंद - हातांनी भांडी धुण्याची कश्मकश; वॉशिंग मशीन आणि ड्रायर बंद - कपडे स्वतः धुण्याची आणि वाळवण्याची अडचण (अहो ओले कपडे वाळवणार कुठे? गॅलरीत वाळत टाकले तर लोकं बोंबा ठोकतात); मायक्रोवेव्ह बंद - खाण्यासाठी काहीही गरम करण्याची उजागरी नाही - डोकं तेवढं उगाचंच गरम; बर्‍याच घरांत स्वयंपाकाच्या गॅसऐवजी विजेवर चालणार्‍या आधुनिक शेगड्या असतात - तिथे आता घरी
कुठलाच खाण्याचा पदार्थ करण्याची सोय न राहाता घरकर्‍यांचे हाल 'गॅसच संपल्यागत' होतात. महिन्याचे विजेचे बिल भरतानाच आपल्याकडे वीज आहे याची आठवण होणार्‍या अमेरिकन जनतेला आता भोवंड यायला लागते. महाराष्ट्राकडील दररोज होणारी विजेची कपात काही नाही तरी "सहनशीलता" नावाचा गुण आपल्याला देऊन जाते. कधीही वीज जाऊ न देणार्‍या अमेरिकन शासनाने येथील नागरिकांना चोवीस तास विजेची अतिशय वाईट सवय लावून पंगू करून ठेवले आहे. त्यासाठी पुढे भोगाभोग ही आलीच!

क्रमश:

भाग १
भाग २
भाग ४

Comments

Popular posts from this blog

सावजी

ऑफिस - भाग १ : अमेरिकन बायका

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम