काही गोष्टी, काही गमती ........

Sunday, January 15, 2006

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

या भागाला दिलेले नाव वाचून "तेलुगु देसम" राजकीय पक्षाशी येथे काही संबंध आहे काय असा तुम्हाला एक सहज प्रश्न पडला असेल तर मी तुमची ती शंका संपूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणार नाही. फक्त एक सुधारणा - लेख राजकीय पक्षाशी संबंधित नसून ऑफिसमधील संपूर्ण तेलुगु देशबांधवांची प्रशंसा आणि उदोउदो आहे.

तुम्हाला आतापर्यंत कळले असेलंच की मी ज्या ऑफिसमध्ये जातो (कशासाठी जातो, काय करतो, किती वेळ करतो हा वेगळा विषय आहे - तो आपण पुन्हा कधीतरी उगाळून काढू!) ते ऑफिस अमेरिकेतील एका बर्‍यापैकी चालणार्‍या कंपनीचं माहितीतंत्रज्ञान विभागाचं ऑफिस आहे. अमेरिकेला अर्थार्जनाकरिता आलेल्या अनेक भारतीय देशबांधवांपैकी बरेच लोकं इथे काम करतात. फक्त ह्या काम करणार्‍यांपैकी एका भल्या मोठया समूहाचे अर्थार्जनाव्यतिरिक्त 'स्थलांतरण' हा एक गुपित उद्देश्य असतो. असो बापडा! ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे राहावे; मरेस्तोवर राहावे. यांत भारतातील प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधी तर आहेतच, पण कुठल्या प्रांतातील प्रतिनिधींचे प्रमाण किती आहे यामध्ये मात्र बरीच तफावत आहे. आमच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या भारतीयांपैकी फार तर वीस टक्के प्रतिनिधीत्व मराठी, तामिळ, कानडी, मळयाळी, पंजाबी, उत्तर भारतीय आणि इतर हिंदी भाषिक, बिमारू (बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश) राज्यांतील रत्ने व बंगाली यांचे मिश्रण आणि बाकीचे सगळे गुजराती अशा सगळ्या प्रांतांमध्ये विभागिले गेले आहे. उरलेले ऐंशी टक्के प्रतिनिधीत्व आंध्र प्रदेशातील होतकरू तेलुगुंना मिळालेले आहे. म्हणजे "अनेकता मे एकता", 'हम पंछी एक डाल के" वगैरे जे काही भारतीय विभिन्नतेमध्येदेखील ऐक्याबद्दलचे वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत, त्याचा तंतोतंत प्रत्यय ह्या आमच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये येतो. फक्त एकूण शंभर डाळी असणार्‍या ह्या झाडाच्या ऐंशी डाळ्यांवर तेलुगु पंछीच बसलेले दिसतात!

तसे तेलुगु बायामाणसे वेगवेगळ्या विभागात, प्रकल्पात विखुरलेली आहेत. पण ऑफिसमधील एका मोठ्या संगणक आज्ञावली प्रकल्प विकसन पक्षामध्ये (सॉफ्टवेअर डेवलपमेंट प्रोजेक्ट ग्रुप) 'विखुरणे' या शब्दाचा अतिरेक झालेला आहे. इथे फक्त तेलुगुच तेलुगु (अक्षरशः) विखुरलेले असतात. या पक्षातील संगणक आज्ञावली लिहिणारे, तपासणारे सगळेच वीस-पंचेविस कर्मचारी आपले तेलुगु देशबांधव आहेत. याला एकही अपवाद नाही. येथील औद्योगिक विश्लेषक (बिजनेस ऍनालिस्ट) देखील तेलुगु. प्रकल्प सूत्रधार (प्रोजेक्ट मॅनेजर) सुद्धा तेलुगुच असल्यामुळे सगळ्या कर्मचार्‍यांना सांभाळणे आणि त्यांना त्यांच्या अखत्यारित ठेवणे फार सोयीचे पडते. आता कंपनीच्या उच्च अधिकार्‍यांचे विचार, प्रकल्प गरजा, आदेश इ॰ योग्य रीतीने आणि समजणार्‍या भाषेत प्रकल्प कर्मचारी, विश्लेषक आणि सूत्रधार यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य अति महत्त्वाचे असल्यामुळे प्रकल्प अधिकारी (डायरेक्टर) पण तेलुगु असणे साहाजिकच आहे. पक्षात जेव्हा नवीन कर्मचार्‍याची जागा निघते तेव्हा तो कर्मचारी तेलुगुच असला पाहिजे असा ह्या पक्षाचा अलिखित नियम आहे.

बरे, ह्या कर्मचार्‍यांच्या जागांपैकी कुठली जागा ही संगणक आज्ञावली कार्यक्रम गुण तपासका (क्वालिटी कंट्रोल टेस्टर) साठी असेल आणि त्या दैवी कामासाठी कोणी सापडला नाहीच तर एखाद्या पक्ष कार्यकर्त्याच्या काही वर्षांपूर्वी संगणाकाचा कुठलातरी कोर्स केलेल्या पत्नीला पाचारण केले जाते. गेली दहा वर्षे अमेरिकेत राहून "आय डिड वेन्ट शॉपिंग टुमारो" असल्या सुंदर इंग्रजी बोलणार्‍या ह्या ललनेला क्वालिटी कंट्रोल नामक संगणक प्रक्रियेचे 'अ' का 'ठ' माहित नसते. पण येथे कसलीही आडकाठी येत नाही. इतर तेलुगुभाषिक 'गारु' लहानसहान गोष्टींमध्ये हिची मदत करायला नेहेमी तत्पर असतात. 'गारू' हे तेलुगु संबोधन आपल्या मराठीतले 'साहेब' या सारखे वापरले जाते - म्हणजे 'रावसाहेब', 'बाईसाहेब' वगैरे. तर, तुम्ही 'गारु' आम्ही 'गारु', दोघे मिळून राज्य करू असल्या थाटात हे काम चालले असते. क्वालिटी कंट्रोल कशाशी खातात हे सुरुवातीला माहित नसणारी (आणि कदाचित लोणच्याशी खात असावेत अशी समजूत असणारी) ही महिला काही महिन्यांत क्वालिटी कंट्रोलच्या कामात तरबेज होते. हा प्रकल्प प्रसिद्ध (म्हणजे प्रोजेक्ट रिलीज) झाल्यानंतर त्यामध्ये असणार्‍या काही घोडचुका अगोदरच का नाही पकडता आल्या ही एक न उलगडलेली मोठी बाब आहे. त्याचे कारण काय बरे असावे यावर उच्च अधिकार्‍यांच्या अजूनही लांब बैठका होत असतात.

मला बरेच मित्र विचारत असतात की ह्या पक्षामध्ये कुठली नोकरीसाठी जागा असेल तर आम्हाला कळव. माझा त्यांना पहिला प्रश्न असतो,
"बाबानो, तुम्हाला तेलुगु लिहिता-वाचता येते काय?"
"नाही"
"अरे मग कशाला खटपट करतोस एवढी? तुला तेलुगु येत नाही तर ते तुला घेणार नाहीत."
"अरे पण मला तेलुगु पाढे म्हणता येतात!"
"असं काय! मग प्रयत्न करून बघ."
मला त्यांचा उत्साह खच्ची करायचा नसतो.

अशीच खटपट करून एका मराठी मित्राने शेवटी पक्षाचे तिकीट मिळविलेच. त्याचे कारण त्या मित्राची खटपट नसून एका विशिष्ट कौशल्यसंचाचा (स्किलसेट) कुठलाही 'गारु' त्यांना सापडला नव्हता हे होते. त्या मराठी मित्राचे अभिनंदन करायला म्हणून मी एका आठवड्याने त्याच्याकडे गेलो तर तो जरा दु:खी दिसला. मी विचारले,
"काय झाले? तुला पाहिजे त्या पक्षात नोकरी तर मिळाली. असा रडका चेहेरा करून काय बसलास?"
"अरे डोंगर दूरूनच सुंदर दिसतात ते खरे आहे."
"का? अरे त्या पक्षातील माणसे तर फार मनमिळाऊ आहेत!"
"तोच तर प्रश्न आहे."
"म्हणजे?"
"अरे ती जनता इतकी मनमिळाऊ आहे की पक्षांच्या तांत्रिक बैठकांमध्ये सुद्धा तेलुगुचाच वापर करतात. आता दोन दिवसापूर्वीच प्रकल्पाच्या एका नवीन घटकासाठी आमची बैठक होती. त्यामध्ये चांगले दोन तास सल्लामसलत झाली आणि शेवटी त्यांनी मला ते ज्या निर्णयाप्रत पोहोचले ते काम करायला दिले."
"त्यांत वावगं काय आहे?"
"त्यांनी मला फक्त 'तू हे काम करशील का?' हेच इंग्रजीमध्ये विचारले."
"मग?"
"बाकी सल्लामसलत आणि शेवटचा निर्णय हे सगळे तेलुगुमध्ये झाले ना! मला कुठले काम करायचे आहे ते कळायला तर पाहिजे!"
'तरी मी म्हणत होतो' असे म्हणायची पोटात जबरदस्त कळ उठली असताना देखील मी स्वतःला आवर घातला. मी त्याला सांभाळण्याच्या आवेशात म्हटले,
"अरे मग प्रोजेक्ट मॅनेजरला विचारून इंग्रजीमध्ये समजून घे की कशावर काम करायचे आहे ते."
"ते सगळे ठीक आहे, पण पुढे आणखी एक अडचण आहे."
"कुठली?"
"प्रकल्पाचा अगोदरचा कोड जरा विचित्र आहे. त्या प्रोग्रामांमध्ये ज्या कॉमेंट्स असतात ना, त्या सुद्धा तेलुगुमध्ये आहेत!"
अरे माझ्या रामा! माझ्या एका तमिळ सहाकार्‍याची 'हे लोकं डेवलपमेंटसुद्धा तेलुगुमध्येच करीत असावेत!' ही शंका तंतोतंत खरी उतरलेली बघून मी माझ्या डोक्यावर हात मारला.
"तरी मी तुला म्हणत होतो!", माझ्याच्याने शेवटी राहावलं नाही हो!

तरी सगळीच तेलुगु रत्ने ह्या एका पक्षातच एकवटलेली आहेत अशातला भाग नाही. बर्‍याच स्वतंत्र उमेदवारांची अधूनमधून गाठभेट होत असते. त्यांपैकी एक म्हणजे वर्गणीबहाद्दर. हा माणूस जेव्हाकेव्हा समोरून जातो तेव्हा अगदी खप्पड चेहेर्‍याने. ह्याला "गुड डे" म्हणावे तरी हा मनुष्य परत संबोधित करीत नाही. माझ्याशी काही देणेघेणे नकोच आहे असे ह्याच्या चेहेर्‍यावरून दिसते. पण कुठल्या का साईबाबाच्या मंदिरासाठी वर्गणी गोळा करायची म्हटली की हा माणूस अगदी "हसर्‍या" चेहेर्‍याने माझ्या कक्षेत येऊन वर्गणीकरिता पृच्छा करतो. हा माणूस हसताना दिसतो कसा हे आजवर अवगत नसलेल्या मला पहिल्यांदा त्याच्या भाऊबांधिलकीचे दर्शन घडते. 'मतलबी!', मी त्याला मनात शिव्या मारत दहाएक डॉलरची नोट त्याच्या हातावर ठेवतो. दुसरे एक लबाड रत्न आहे. ह्या माणसाच्या चेहेर्‍यावर "मी अतिशय महामूर्ख आहे आणि मला काही एक कळत नाही" हा भाव सदैव असतो. गुप्तपणे काम काढून घेणे आणि काही घडलेच नाही अशा थाटात वावरणे ह्याचे कौशल्य ह्या माणसात कुटूनकुटून भरले आहे. ह्याच्या गटातील मरमर करून काम करणार्‍यांना पगारवाढ सोडून ह्यालाच बढतीवर बढती का मिळते हे एक न सुटलेले कोडे आहे. आणखी एक महाभाग संपूर्ण कार्यालयाची इमारत आपले घर आहे आणि मोबाइल फोनवरून मोठ्यामोठ्याने कुटुंबियांशी तेलुगुमध्ये बोलत बोलत अख्ख्या माळ्यावरती येरझारा घालणे हा आपला नौकरीसिद्ध अधिकार आहे अशी स्वतःची समजूत करून बसले होते. ह्यांच्या येरझारा सुरू असताना त्या माळ्यावरील एकही मनुष्यप्राणी आपले काम करू शकत नाही हे पाहून उच्च व्यवस्थापनाने त्याच्या डोक्यात फरक पडला आहे म्हणून त्यास शेवटी काढून टाकले.

काही जण एवढ्या तीव्र आठवणींचे नसतात. तरीही आंध्रभाषिकांच्या बोलण्यातील काही उद्गारवाचक वाक्प्रचार डोक्यात घर करून राहतात. त्यापैकी एक म्हणजे "हौ नाऽऽऽऽऽ". येताजाता जर कुण्या तेलुगुभाषिकाच्या टेलिफोनवरच्या संभाषणामध्ये "हौ नाऽऽऽऽऽ" कानावर पडले तर त्या कक्षाच्या बाजूला जरा वेळ हळूच थांबावे, पुन्हा काही सेकंदात एखादा "हौ नाऽऽऽऽऽ" ऐकायला मिळेल. पुन्हा थोड्या वेळाने आणखी एक "हौ नाऽऽऽऽऽ". "हौ नाऽऽऽऽऽ" हा उद्गार कधी एकट्याने येत नाही. त्याच्यासोबत आणखी दोन-चार "हौ नाऽऽऽऽऽ" असावे लागतात हा माझा अनुभव आहे. पहिल्यांदा "हौ नाऽऽऽऽऽ" ऐकणार्‍या मराठी माणसाची प्रतिक्रिया "हे काय भलतंच!" अशी निघण्याची हमखास शक्यता असते. श्वास धरून उडी मारताना उच्चारलेले "हौ" आणि नंतर "ना" असे ओरडून मरण पावणार्‍या माणसाच्या शेवटच्या श्वासासोबत निघणारा "नाऽऽऽऽऽ" असा दूर विरत जाणारा आवाज, असला विचित्र उच्चार असणारे हे उद्गार आहे. "सीईंग ईज बिलीविंग" (म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी बघायलाच पाहिजे) ह्या इंग्रजी म्हणीसारखेच "हिअरींग ईज बिलीविंग" (म्हणजे विश्वास ठेवण्याकरिता ऐकायलाच पाहिजे) केल्याशिवाय "हौ नाऽऽऽऽऽ" ची मजाच येत नाही. हैदराबादने "हौ नाऽऽऽऽऽ" ही जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे; आणि आंध्रभाषिकांनी दिलेली आमच्या कार्यालयाच्या इमारतीला!

तेलुगुभाषिक असे कुठल्या पक्षात एकत्र असूदेत किंवा इकडेतिकडे विखुरलेले असूदेत, सामाजिक कार्य करायचे म्हटले की ही सगळी मंडळी एकत्र आल्याशिवाय राहात नाही. दिवाळीचा कार्यक्रम हा असल्याच कार्यांपैकी एक. ह्यात इतर प्रांताच्या भारतीयांनासुद्धा भाग घेता येतो. उदाहरणार्थ, मागच्याच वर्षी झालेल्या दिवाळीच्या कार्यक्रमासाठी बॅनर छापून आणण्याचे काम माझ्याकडे 'माहिती चक्ती' (कंपॅक्ट डाटा डिस्क) वर सोपविल्या गेले होते. मी ते बॅनर छापून आणेपर्यंत त्यावर "हॅप्पी दिवाली" असे इंग्रजीमध्ये आणि त्याखाली "शुभ दीपावली" असे तेलुगुमध्ये लिहिले होते याचा मला गंध नव्हता. असो. तेलुगु ही सुद्धा एक भारतीय भाषाच आहे म्हणून मी त्याकडे कानाडोळा केला. पण कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा "ही दिवाळी आपणां सगळ्यांना सुखाची जावो" असल्या आशयाच्या तेलुगु गाण्याने झाली. शेवटी काही स्पर्धेमध्ये विजेत्या आमच्या "एरिक" नामक अमेरिकन सहकार्‍यास मिळालेले पारितोषिक देखील "टू एरिक गारु" असल्या थाटात वितरण्यात आले. माझ्या बर्‍याच अमेरिकन सहकार्‍यांची "भारताची राष्ट्रीय भाषा 'तेलुगु' आहे आणि 'मराठी', 'हिंदी' ह्या भाषा तेलुगुच्या बोली आवृत्त्या (डायऍलेक्ट) आहेत" अशी एव्हाना समजूत झाली होती. एवढे सगळे दिव्य बघितल्यावर मी त्यांना खोटं का ठरवू?

आमच्या कार्यालयाच्या इमारतीत असणार्‍या शेकडो देशबांधवांपैकी (यापैकी बर्‍याच जणांनी अमेरिकेचे नागरीकत्व पत्करल्याने ते नेमके कोण हा एक बिकट प्रश्न उद्भवलेला आहे!) फार तर मोजून दहा-पंधरा लोकं मराठी आहेत. यामध्ये सुद्धा त्यांच्यापैकी बर्‍याच जणांशी मराठीत बोलायला जावे तर उलटे उत्तर इंग्रजीत ऐकायला मिळते. अशा वेळेस मला हळहळ वाटते की आपले संबंध ह्या आंध्रच्या लोकांसारखे का नाही होत. चुंबकामध्ये असणार्‍या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांपैकी उत्तर ध्रुवाला उत्तर ध्रुव अपकर्षित करतो किंवा दूर ढकलतो. त्याप्रमाणे आमच्या इमारतीतील मराठी इसमांचे आहे. त्यांत चुकून एखादा दक्षिण ध्रुव असणारा निघतो आणि त्याच्याशी आपली छान गट्टी जमते. तेलुगु लोकांमध्ये मात्र ध्रुवच नसतो हे आता मला कळले आहे; आणि तेच कदाचित त्यांच्या सर्वत्र एकसारख्या सामाजिक बांधिलकीचे कारण असावे. माझे तेलुगुभाषिकांशी वाकडे आहे असा समज करून घेऊ नका. उलट तेलुगुभाषिक जनता ही फार मनमिळाऊ असते असे माझे मत आहे - फक्त तुम्हाला तेलुगु यायला पाहिजे. म्हणून मला ऑफिसात कोणी 'गारु' दिसला तर मी त्याला दूरूनच तस्मै आंध्रभाषिकाय नम: म्हणून नमस्कार घालतो आणि आपली वाट पकडतो.

क्रमशः

23 Comments:

At Monday, January 16, 2006 10:18:00 AM, Anonymous Anonymous said...

तुमचा ब्लॊग वाचला. मी सध्ध्या हैद्राबादमध्ये नोकरीस आहे. तुम्ही अमेरिकेत असून तुम्हाला इतक्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतायत तर आमच्यासारख्या 'खिंडीत' सापडलेल्या मराठी भाषिकांचे काय हाल होत असतील त्याची कल्पनाच बरी :) असो, ब्लॊग मात्र झकास आहे !

 
At Monday, January 16, 2006 10:43:00 AM, Anonymous आशिष दीक्षित said...

तेलुगू ही तिसरी सगळ्यांत मोठी भारतीय भाषा आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. इथे मद्रासमध्ये या तेलुगू लोकांनी तामिळांच्या सुद्धा नाकी नऊ आणले आहेत! इथली सगळी मोठी दुकानं, हॉटेल्स वगैरे तेलुगू लोकांचीच आहेत.
असो. मला वाटतं यांच्यापासून तरी आपण मराठीजनांनी काही शिकायला पाहिजे. संघे शक्तिः कलौ युगे..
आपला,
ashish.scribe@gmail.com

 
At Tuesday, January 17, 2006 2:36:00 AM, Blogger paamar said...

मराठी माणसांच्या संबंधांना दिलेली चुंबकाच्या 'ध्रुवा'ची उपमा अतिशय समर्पक आहे !

 
At Tuesday, January 17, 2006 8:39:00 PM, Blogger Nandan said...

येल्लावुन्नारू, पवनगारू? छान लेख आहे. 'हौ ना' चा प्रत्यय मलाही दररोज येत असल्यामुळे लेख अगदी मनाला भिडला. :-) असो, साईबाबा आणि तेलगू चित्रपट ही या जनतेची दोन श्रद्धास्थाने आहेत; त्याबद्दल तुझ्या नेहमीच्या खुमासदार शैलीतल्या लेखाची प्रतीक्षा आहे. (जिज्ञासुंनी कृपया www.idlebrain.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. दुपारी कार्यालयात कंटाळा येत असताना येथील आगामी चित्रपटांतील दृश्ये पाहण्यासारखे दुसरे मनोरंजन नाही.)

 
At Wednesday, January 18, 2006 6:37:00 PM, Blogger Pawan said...

Anonymous, आशिष, पामर आणि नंदन,

तुमच्या प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद!

अनॉनिमस असा हैदराबादेतील खिंडीत सापडला आहे, आशिषच्या मद्रासमध्ये सगळ्या दुकाना-हॉटेलांवर धावा बोलण्यात आला आहे, नंदनला "हौ ना" ची प्रचिती येतच असते आणि पामरला समर्पक वाटणारी ध्रुवांची उपमा ह्या गोष्टींवरून मला वाटते की अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आपल्या माणसांना येणाऱ्या अनुभवांमध्ये असणारे कमालीचे साम्य आणि सारखेपणा थक्क करणारे असतात.

कुत्र्याची शेपूट कुठेही वाकडीच; ती इथूनतिथून सारखीच याचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.

 
At Thursday, January 19, 2006 11:43:00 PM, Blogger Shailesh S. Khandekar said...

पवन,
मुळ लेखाप्रमाणेच ही प्रतिक्रियाही जोरदार आहे. खरोखरच खुप सुंदर निरीक्षण आहे.

 
At Tuesday, January 24, 2006 5:41:00 AM, Blogger आदित्य said...

मग एव्हाना तुला तेलगु येवू लागलं असायला पाहिजे. आमच्या पुण्यात यंदाचे गणपति सुद्धा तेलगु गाणं (१ च)ऐकून ऐकून विसर्जित झाले. गाण्याचे बोल होते 'आ SS आन्टे अमलापुरम' अर्थ काहिच नाही मूळ चित्रपट : 'आर्या' गाण्यात नट-नटी आणि इतर रेल्वेच्या टपावर.... देवांचे हे हाल तर आपण बापुडी तर तुच्छ माणसं. आता तर शिवसेना सुद्धा (उ) आणि (रा) झाली आहे मराठी माणूस खिंडीतच राहयची चिन्हं आहेत.

 
At Wednesday, January 25, 2006 2:21:00 AM, Blogger KISHOR AWACHAR said...

पवन,
अरे बाबा तु अन्यायला वाचा फ़ोड्लीस.
तामिळ या पेषा भयानक रे बाबा!
टीम मध्ये तामिळ आहेत,मी येडा बघतच राहतो.
उपाय नाहि

 
At Sunday, March 05, 2006 1:44:00 AM, Blogger Rga said...

सगळाच blog मस्त लिहिलाय अगदी. तेलगु,तामिळ लोकांचे अनुभव तर अगदी तंतोतंत पटण्यासारखे:))
मला आजच कळल कि marathiblogs.com site तुम्ही तयार केली आहे म्हणुन.खरोखरच मनापासुन कौतुक वाटल अगदी.भरपुर कष्ट घेतले आहेत तुम्ही त्या site साठी.छानच झाली आहे ती ही साईट.

 
At Monday, March 20, 2006 2:52:00 AM, Blogger Nandan said...

Pawan bhau, office - bhag 3 liha ki. Kadhichi vaat baghoon rahiloy. :)

 
At Wednesday, April 05, 2006 10:10:00 PM, Blogger Vishal said...

पवन,
वरती ब-याच लोकांनी छान छान प्रतिसाद दिल्यामुळे मी वेगळं काही लिहीत नाही. दोन्ही भाग सुंदर जमलेत. तिस-या भागाची वाट पाहात आहे.

 
At Wednesday, April 12, 2006 9:25:00 AM, Blogger amity said...

सही रे..
आम्ही तर
USA चा full form हा United States of Andhra असंच मानतो.

 
At Sunday, June 04, 2006 4:11:00 PM, Anonymous Rahul said...

zakaas

 
At Wednesday, July 12, 2006 5:45:00 AM, Anonymous Bharati R bhutada said...

पवनजी, तुमचा हा लेख वाचुन मी हादरलेच.तुमच तेलगु जातीवरील विचार पाहुन.आत्ता पर्यंतच्या माझ्या मनात असलेल्या प्रतीमेला कींचीत तडा गेला कारण मी ही तेलगुच. पण हेल काढुन बोलणारी नव्हे.माझा जन्म,शिक्षण, सासर (मारवाडी) पुण्याच.लग्नांनंतर लगेच माझी भट्कंती सुरु झाली.Hong - Kong मद्धे चीनी Dubai मद्धे अरबी भाषा कामापुरत शिकत आहे.ज्यांचा बरोबर व्यवसाय करायचा त्यांना त्या भाषेत बोलल तर आधिक आवड्त, असा माझा अनुभव आहे.तेंव्हा (पानी मे रहेके मगर मच्छ से डरे तो मरे/) माझी काही उपदेश देण्याची लायकी नाही.कारण तुम्ही माझे आदर्श आहात.अयोग्य वाट्ल्यास sorry.

 
At Sunday, August 06, 2006 7:24:00 AM, Blogger Akira said...

Hi Pawan..baryach diwasanni ithe bhet dili...lekh ani pratikriya wachun manoranjan jhale...jokes apart...tu lekhachya shewati namud kelyapramane marathi mansane hya telgu bandhawanpasun barech shikanyasarkhe aahe....aso...ashi charcha marathi manus uttam ritya karu shakto...krutitoon kahi hoeel tevha hovo :)

 
At Wednesday, August 30, 2006 5:34:00 PM, Anonymous Anonymous said...

This comment has been removed by a blog administrator.

 
At Thursday, February 01, 2007 2:22:00 AM, Blogger Mukta said...

Hi Pawan,

Tumhi barcs chaan lihta... I will scrap u in marathi next time for sure :) I have added ur blog in our search engine for India.
can i add u in my gmail messanger

Mukta kher

 
At Friday, June 29, 2007 2:25:00 AM, Blogger Umakant said...

Zakas, khup chaan article ahe.
Me pahilyandach hi site baghto ahe. tuza ha lekh khup aawadla.

Ha lekh wachtana Pu La nchya (Pu. La. Deshpande) vividh lekhan chi aathvan aali.
Aani pardeshat astana suddha marathi mansane marathi japli he pahun aanand zala.

 
At Saturday, September 29, 2007 2:11:00 AM, Blogger prabhakar said...

मीत्रानो,
मी पन असाच गेली २३ वर्श त्रासात आहे . हे पहा आपन जो पर्यन्त एक होत नाहीत आणी थोडसं टाईट होत नाहीत तो पर्यन्त हे भडवे लोक सीधे होनार नाहीत . हे एक दुसर्याला खुप मदत करतात आपण एक दुसर्याला भान्डतो . टिन्गल ्टवाळी करतो. हे डुकरं एक रहातात . हे लोक ईन्कोम्पीटन्ट रहातात. हे लोक नीच रहातात . मला फ़ार छान माहीत . ह्याना जवळ एऊ द्यायचे नाही कधीच . आपली युनीटी वाढवायची . ह्याना गोडच बोलय्चे फ़क्‍त तोन्डावर . पन सावध रहायचे . जो पर्यन्त आपन एक होत नाहीत आनी एका एका कम्पनी मधे युनीटी आनी मेजोरीटी वाढवत नाहीत आनी चान्गले काम करून दाखवत नाहीत तो पर्यन्त आपल्या सर्वाना हाच त्रास भोगावा लागनार आहे . प्रत्येक क्षेत्रात हे मल्याळी,तमीळ,कानडी,ऊडीया,तेलुगु ईन्कोम्पीटन्ट लोकानी उछ्छाद माजवला आहे .
ह्या डुकरान्चे उच्चार ईतके घान असतात आनी हे लोक चुक गोश्टी च बरोबर आहे असं करून दाखवतात . का तर ह्याना बडवून काढनारे कोनी नाही.
हे ईलेवन चा उच्चार लेवन करतात. तेही ठासुन . भड्व्याच्न्या बापाची ईन्ग्रजी आहे काय? हे सकळच्या नास्त्याला टीफ़ीन म्हनतात. हे क्यारी ब्याग ला कवर म्हनतात. how can a bag become covar ? cover is different thing and a bag is different thing.how can a breakfast be tiffin? tiffin is a a utensil in which food is carried.if pronounciation of ELEVAN is लेवन then ELEPHANT will become लेफन्ट . मल्याळी भड्व्यान्चे तर ईतके घान उच्चार असतात की ओकारी यायला लागते . ह्याना लाजा सु्ध्धा वाटत नाहीत . मी ह्याना सूअर भडवे म्हनतो . ह्याना मारून मारून तडीपार केले पाहीजे . ह्यान्चा आत्मवीश्वास वाढत जातो साल्यान्चा . आपन वेडे ठरत जातो . हे समोरच्या मानसाला नीग्लेक्ट करतात . आप्ल्याच भाशेत हे बोलत बसतात . समोरच्याल नीग्लेक्ट करतात. आनी तुम्हाला जे माहीत नाहे ते सान्गतो . हे सगळे च्या सगळे फ़ेक सर्टीफ़ीकेट वाले आहेत . फ़ेक सर्टीफ़ीकेट .फ़ेक पासपोर्ट ,फ़ेक वीसा,हैद्राबादला चार्मीनार ला २००० रु . मधे जे पाहीजे ते सर्टीफ़ीकेट मिळते . हे सगळेच्या सगळे फ़ेक आहेत . ह्यान्च्या डाक्टर कडे कधीच जाउ नका बरे . तो फ़ेक सर्टीफ़ीकेट वाला असतो . ९९% लोक हीजडे वाटतात . नव्हे आहेतच . ह्यानी तर hour चा उच्चार हावर ,honest चा उच्चार हानेस्ट करायला सुरु केला आहे . हे साले सूअर कोनत्या शाळा मधुन शीकतात समजत नाही. आनी वरुन टाईट बोलतात . नीयम मोडायला एक नम्बर असतात अप्रामानीक असतात . दुसर्या भाशेच्या कीतीही मोठ्या मानसाला हे साहेब म्हननार नाहीत नमस्कार करनार नाहीत . ह्याना ठेचून काढले पाहीजे . अरे हे हीजडे लोक साले आप्ल्या कडे बायका बायका एकत्र शोउचाला बसता तसं ह्यान्च्यात मानसं एकत्र शोउचाला बसतात . मी पाहीलं आहे .
मीत्रानो मला पहील्या पासुन च चूक गोश्टीचा आनी ईन्कोम्पीटन्सीचा फ़ार राग आहे . पच पच बोलनार्याचा आनी हीजडा प्रवरती चा फ़ार राग आहे .
मल्याली, तमील , कानडी, तेलुगु,ऊडीया लोकाना एकत्र एऊन ठेचा . आपली एकी वाढवा . ह्यान्च्याशी. ह्यान्च्या मधे शिवाजी,टीळक,सावरकर,गोखले कोनी झाला नाही . ह्या भडव्याना पहील्याच भेटीत ठेचा. हीसका दाखवा . बाळ ठाकरे साहेब च बरोबर आहेत . मीत्रानो मुम्बई ,पुने ,नागपुर हाताताउन गेलं आहे . आता एकी वाढवावी लागेल .जय शिवाजी , जय मरठी . समर्थ रामदास स्वामी चे गायडन्स घ्यावे लागेल .

 
At Monday, October 01, 2007 10:18:00 PM, Blogger संदीप चित्रे said...

Interesting to know your blog. I will try to read more your articles soon. Please check www.atakmatak.blogspot.com, the blog I started recently.
Cheers

 
At Saturday, May 30, 2009 12:05:00 PM, Blogger Kaustubh said...

छान लिहिले आहे!

~ कौस्तुभ

 
At Sunday, July 26, 2009 1:54:00 AM, Anonymous Anonymous said...

Pavan,

Mala suddha ha anubhav ithe Ameriket roajach yeto. Athishay ashishnu, urmat ani asanskrut loak. Keval sankyabalchya joravar he garu ekmekala, tarun netat.Tynachya kamachya patratevishayee kay bolave? Tu lihilela QA cha anubhav purushnchya babatit suddha yeto.Ekada ek "highly" experienced IT specialist, hyderabadi MBA spreadsheet ughadun "Edit" function kase vaprayache vicharu lagala teva mala zeet yayachi shillk rahili hoti.. Aso Lekh bhidla. itaks ki blogla hi mazi pahilich prikriya lihili ahe.. Abhar

 
At Friday, October 30, 2009 6:53:00 AM, Blogger Smit Gade said...

agadi uttam...

 

Post a Comment

<< Home