काही गोष्टी, काही गमती ........

Wednesday, November 09, 2005

सावजी

सावजी म्हणजे नेमके कोण हा प्रश्न सोडवणे तसे किचकटच आहे. जसे आपले आचारी, सुतार, कुंभार, तसे सावजी हे पण कुठल्या जमातीचे नांव आहे काय असे मला उगाच वाटत असावे. "सावजी" हे एक आदरपूर्वक संबोधन म्हणून सुद्धा वापरल्या जाते; पुष्कळदा कवितेत. म्हणजे "या सावजी - घ्या सावजी, कसं काय रावजी" - वगैरे यमक साधण्याचा प्रकार साधायला कवई मोकळे. पण आमचा सावजी ह्या शब्दाशी संबंध मात्र "सावजी कोंबडी" ह्याच वाक्यातील प्रयोगाशी येतो. तुम्ही शाकाहारी असाल तर पुढचा संपूर्ण लेख हा अगदी जहाल मांसाहाराशी संबंधित आहे याची जाणीव असू द्यावी. मांसाहार हा आपला आवडीचा विषय नसेल तर समोरचे शब्द पालथी घालण्यापूर्वी जरा विचार करावा. नंतर म्हणू नका की सांगितले नाही म्हणून!

तर, कोणी सावजी म्हटले रे म्हटले की आमच्यासमोर झणझणीत अस्सल रश्याची देशी (जिला गावराणी पण म्हणतात) कोंबडीची तिखट भाजीच येते. मोठ्या प्रेमाने आम्ही त्या भाजीला "सावजी चिकन" म्हणतो. आणि त्यांत तर खास कांडूण आणलेल्या लाल मिरचीच्या तिखटाचा आणि घरीच वाटून बनवलेल्या अस्सल मसाल्याचा सुळसुळाट झाल्याशिवाय तर काही मजाच येत नाही. कोऱ्या स्टेनलेस स्टीलच्या ताटातील प्लेटमध्ये अशी कोंबडीची भाजी, गरमागरम गव्हाच्या पोळ्या, लिंबू, मीठ आणि बाजूला पाणी भरलेल्या पेल्यात तिखट कांदा असल्या थाटाचे अस्सल मराठी सावजी जेवण जेऊन कुठलाही थोर माणूस "सावजी" बनल्याशिवाय राहणार नाही (जर हे वाचून "तोंडाला पाणी" सुटले तर कळवण्यास विसरू नका!). शेवटी सावजी हा प्रकारच फक्त कवितेतील संबोधन किंवा झणझणीत कोंबडीचे जेवण ह्यांपुरता मर्यादीत न राहाता जीवनमानाची शैली अशा अफाट कामगिरीवर नियुक्त झाला आहे. तर सावजी माणूस कसा असतो?

सावजी माणूस हा काही घडत नाही. तो जन्मतःच सावजीगुण घेऊन येतो. फक्त ते सावजीगुण कधी बाहेर येरझारा घालतील त्याची प्रत्येक सावजीची आपली वेळ ठरलेली असते. विचार करा की मी आणि माझा मित्र भल्या संध्याकाळी नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या काठावर बसून दगडं मारतोय. इतकी सुंदर संध्याकाळ असते. सूर्य मावळतीच्या विचारांत असतो. आकाश शांत निळा आणि मावळणाऱ्या सूर्याच्या तांबड्या किरणांनी एकाच वेळेस माखून निघालेले. आकाशाचे प्रतिबिंब तलावात पडून एक वेगळा आसमंत तयार झालेला असतो. आणि पक्षांचा सुंदर थवा घरट्याच्या मार्गावर परत फिरलेला असतो. थवा! मी आपला नि:संकोचपणे उच्चारतो, "आहाहा! काय सुंदर देखावा आहे. बघ ते पक्षी किती सुंदर दिसताहेत!". आमचे थोर मित्र उद्गारतात, "हं॑ऽऽऽ! कसे लागत असतील?". आता सावजी प्रकृतीचे कुठलेही उदाहरण यासमोर फिक्केच पडणार. त्या सुंदर देखाव्याचा आमच्या मित्रावर काही औरच परिणाम झालेला असतो. असली कल्पनाशक्ती असणं हे प्रकृतीने दिलेली "सावजीगुणाची" जन्मजात खोड असल्याशिवाय मुळीच शक्य नाही.नागपूरातील कॉलेजातल्या दिवसांमध्ये आमची काही ठिकाणांची नियमित वारी होत असे. ही वारी काही देवळाचे किंवा ललनांचे दर्शन सुद्धा घेण्यासाठी नव्हे तर आमच्या सकळ सोबत्यांसोबत आमचे "सावजी" असण्याचे कर्तव्य पार पाडण्याकरिता. नियमितपणे नागपूरातल्या बब्बू रेस्टॉरेंट मधल्या मसालेदार "तन्दूरी"चा समाचार घेणे, कधी सिताबर्डीतल्या हनुमान गल्लीमधील पकोडेवाल्याचे झणझणीत पकोडे हादडणे असल्या कार्यक्रमांनी आम्ही न्हाऊन निघायचो. अजूनही परत कधी गेलो तर मित्रांसोबत तिथला फेरफटका होणार हे ठरलेले असतेच.

अमेरिकेत गेलेल्या सावजी माणसाची सगळ्यात मोठी अडचण हीच असते की देशी कोंबडी देशी "स्टाईल"मध्ये मिळणे ही एक दुर्लभ सवलत होऊन जाते. जरी जाताना अस्सल देशी मसाला घेऊन गेलात तरी "कोंबडी" मात्र परदेशीच मिळते ना? अमेरिकेत मिळणाऱ्या कोंबड्या ह्या आधुनिक किराणा दुकानांमध्ये शीतकप्प्यामध्ये छान दिसणारे "पॅकेजिंग" करून ठेवल्या असतात. त्यात ताजे असे काहीच नाही. फक्त काही न्यू यॉर्क, डॅलस, लॉस एंजेलिस असल्या मोठ्या शहरांमधील काही उपनगरांत काही ठिकाणी ताज्या कोंबड्या तेव्हाच्या तेव्हा मिळतात. पण देशी ती देशीच. त्यापुढे कितीही ताजी किंवा शीतघरातून आणलेली थंड अमेरिकन कोंबडी ही रबरच लागते. तरीही आपला सावजी माणूस मस्तपैकी मायदेशाहून आणलेले मसाले टाकून टाकून आणि तिखट घालून घालून ती रबरागत लागणारी कोंबडी उदारमनाने देशी मानून पोटात घेतो.

बरे, अमेरिकेतील सगळेच खाणपाण असे मिळमिळीत असते अशातला भाग नाही. येथे आल्यावर आपल्या सावजी माणसाला "हॅलेपेनो" नामक मेक्सिकन मिरच्यांची चव कळते. स्वतःची वेगळी अशी आंबट-तिखट चव असणाऱ्या ह्या मिरच्या मग सावजीरावांच्या जेवणातल्या हिस्सा बनून जातात. तसेच उत्तम थाई "रेस्टॉरेंट"मध्ये मसालेदार जेवणाची सुद्धा येथे सरबराई असते (अर्थात भारतात पण ह्याची सोय मोठ्या हॉटेलांमध्ये आणि महागड्या जेवणालयांमध्ये आहे. झणझणीत मराठी जेवणाची सोय घरात असतां सावजी माणूस अशा ठिकाणी कशाला जाईल हा वेगळा प्रश्न आहे). थाई जेवण हे भारतीय जेवणापेक्षा वेगळ्या प्रकारच्या मसाले आणि मिरच्यांनी बनवतात. पण सावजी माणसाला भारतीय जेवणाइतकेच थाई जेवणाचा लळा लागायला वेळ लागत नाही. पण राहून राहून भारतातील मूळ "सावजी" जेवणाची आठवण सतावणे काही कमी होत नाही.

आपल्याकडील पाणीपुरी किंवा गोलगप्पे किंवा फक्त गुपचुप हा प्रकार सावजी जीवनातला अविभाज्य घटक आहे. मुंबईतल्या "फास्ट फूड" वडापाव ह्या पोट भरण्याच्या साधनाच्या पलिकडची पाणीपुरीची ख्याती आहे. सावजीप्राणी जेव्हा पाणीपुरीच्या आसपास येतो तेव्हा तिचा समाचार घेतल्याशिवाय राहात नाही. "भैया और तीखा बनाओ!" म्हणून आणखी तिखट घालून बनवलेले "स्पेशल" झणझणीत पाणीपुरीचे पाणी (हो, याला 'रस्सा' ऐवजी 'पाणी'च म्हणतात!) अधिकाधिक तिखट केल्याशिवाय सावजींचे तोंडसुख जमत नाही. असेच पाणीपुरीचा समाचार घेण्यासाठी बरेच सावजी मित्र जमले असता "कोण जास्तीत जास्त हादडतो" ही शर्यत होणार हे ठरलेलेच. मग कोणी तीसवर, कोणी पन्नासवर आणि सगळ्यांना पुरून उरणारे कोणी सत्तरवर आपल्या पाणीपुरीचा आकडा न्यायला तयार. जलदगतीने गोलगप्पे पचवण्याच्या या शर्यतीमध्ये "कोणी खरेच किती बरे हादडले" याची मोजणी करणारा पंच म्हणजे खुद्द पाणीपुरीवालाच असावा लागतो. कारण ह्या शर्यतीमध्ये खरच कोण किती खातो हे बघण्यापेक्षा सगळेच सावजीबंधू हादडण्याच्या कामात जुंपले असतात. अशा वेळेस पाणीपुरीवालाच प्रामाणिकपणे ही गणना करू शकतो. ही गणनाच तर त्याच्या व्यवसायाचा पाया असते. म्हणजे "आप ने तीस खाये, आप ने पैंतीस और आप के हुए सत्तर" ह्या माहितीचेच तर त्याला पुरेपूर पैसे मिळणार असतात!

बरे, सावजी जीवनशैली ही फक्त पुरुषाकरताच नसून स्त्रीसुद्धा त्यांत अग्रेसर असते. उदाहरणार्थ, "पाणीपुरीचा समाचार" ह्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा सावजी स्त्रियांचेच प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही केवळ पुरुषप्राधान्य जीवनशैली आहे असा गैरसमज करून घेऊ नका.

एकदा परदेशात आम्ही काही सावजी मित्र जमले असतां आमच्या कोंबडी पाकक्रिया येत असणाऱ्या मित्रामागे आम्ही "भाजी तिखट कर" म्हणून तगादा लावला. आमच्यापैकी एकजण भारतात सामानसुमानासह परतणार होता. आता सगळे मित्र येथे जमले आहेत तर ही संधी कधी येईल ह्याची काहीच कल्पना नसल्यामुळे आजपर्यंत जेवढे झणझणीत जेवण झाले नाही तसली भाजी बनवण्याचा ठराव पास झाला. घरच्या असावजी सदस्यांसाठी त्यातल्या त्यात साधी हलक्या तिखटाची वेगळी भाजी बनवण्याचा पण बेत ठरवावा लागला. तर आमच्या स्वयंपाकी सावजी मित्राने स्वतःसोबत आम्हा पामरांकरता तयार होणाऱ्या झणझणीत भाजीत घरी असलेल्या सगळ्याच हिरव्या मिरच्यांची ठेच उलथली. साध्या तिखटापेक्षा भाजीसाठी असणाऱ्या हिरव्या मिरच्यांचा दम हा किती जास्त असतो हे सूज्ञांस सांगायची गरज नाहीच.

तर, हे जेवण तयार झाल्यानंतर मंडळी भोजनाकरता बसली. तिथेच बऱ्याच जणांनी शर्यती लावल्या "सगळ्यात तिखट भाजी कोण कितपत खातो?". काही साध्या भाजीच्या श्रेणीतली जनतासुद्धा "आज आम्ही तिखट असणारी भाजी खाऊ. तिखटच पाहिजे!" म्हणून आमच्या गटात सामील झाली. आम्ही सुद्धा "घ्या लेकहो" म्हणून तिखटाच्या भाजीवाल्या गटात त्यांचे स्वागत केले. आमच्या सावजी विशारद मित्रांपैकी सगळेच ताव मारून खाण्याच्या कार्यक्रमात मग्न झाले असतां उरलेल्यांची गंमत बघू लागले . हळूहळू मूळच्या "तिखट" श्रेणीमध्ये नसणाऱ्या पण अट्टाहासामुळे आमच्या गटात सामील झालेल्या मंडळींपैकी एकेक सदस्य निकामी होऊ लागला. काही जण कपाळाला फुटलेला घाम दूर करत, काही जण तोंडाचा धूर होऊन पहिल्या काही मिनिटांमध्ये, तर काही जण उठून प्रात:क्रियाखोलीमध्ये पळेपर्यंत असे क्रमाक्रमाने गारद होऊ लागले. "जहाल" म्हणजे नेमके काय ह्याची त्यादिवशी सगळ्यांना प्रचिती आली असावी कारण मंडळींपैकी काहींनी "आता नको रे बाबा" चा प्रण सुद्धा घेतला. ह्या प्रकरणानंतर प्रजा निपचित पडली. कोण पोटावर हात ठेवून व्हिवळतोय, कोण हुस्सहुस्स करतोय, कोणाच्या सगळ्या शरीरातील लहानमोठ्या सगळ्याच रंध्रांतून धूर निघतोय आणि कोणी प्रात:क्रियाखोलीमध्ये गेल्या तासाभराचा तळ ठोकून बसलेला आहे असे जगावेगळे ते द्रुष्य होते. त्यादिवशी सावजी कोण आणि असावजी कोण याचा निकाल तर लागलाच पण खऱ्या सावजीची तिखट खाण्याची शक्ती कशी अमर्याद असते हे सुद्धा कळले.

सावजींच्या तिखट खाण्याच्या अमर्याद शक्तीमुळे मत्सर निर्माण होऊन बरीच मंडळी "एवढे तिखट कशाला खायचे? काय मिळते त्याने? लेकहो अल्सर होईल तुम्हाला पोटांत!" म्हणून टोमणे मारतानाचे पण ऐकण्यात येते. अशा वेळी सावजी उत्तर तयार असते, "अहो, तिखट आणि मसालेदार खाण्यामुळे पोटातले बॅक्टेरिया नाही का मरणार? जंतूच जगणार नाही तर कुठलाही आजार होईल कसा?". खरे म्हणजे स्वत: तिखट खाण्याची ऐपत नसल्यामुळे टोमणे मारणाऱ्यांच्याच पोटात दुखत असावे असा सावजी तर्क प्रचलित आहे.

अधूनमधून आम्हाला सावजी खाण्याची हुक्की येते आणि आम्ही तोच तिखटपाकक्रिया "सावजी चिकन" कार्यक्रम आयोजित करत असतो. नवीन सावजींना घडवत असतो. सावजी-असावजी मधील प्रत्येकाला आपापली पायरी ओळखण्याकरिता नैसर्गिक निवडणूक घडवून आणत असतो. तुम्ही सावजी असाल तर तुम्हाला दुसऱ्या सावजींना कसे ओळखावे हे अवगतच असेल. जर तुम्हाला हेच माहित नाही की तुम्ही स्वतः सावजी जीवनशैलीमध्ये मोडता की नाही, तर तुम्हाला ह्या आमच्या जहाल निवडणूकीमध्ये भाग घेण्याचे उघड आमंत्रण आहे.