अशी वादळे येती - भाग २: निसर्गाचे समीकरण

मुसळधार पाऊस - त्यामुळे आलेला पूर, किंवा पाऊस न आल्यामुळे दुष्काळ, भूकंप असल्या अबला नैसर्गिक आपत्त्या आपल्याला महाराष्ट्रात अधुनमधुन खाजवून जातात म्हणून ओळखीच्या आहेत. "टोर्नाडो (प्रचंड महाभयंकर चक्रीवादळ)" आणि अमेरिकेतले "लेवल फाईव हरिकेन (म्हणजे आपल्यासोबत भेटीला दीडशे मैलांच्या अंदाधुंद वेगाने वाहणारी वादळे, धूमाधार पाऊस, सेक्युरिटी गार्ड सारखे नेहेमीच सोबतीला ठेवलेले अनेक टोर्नाडो आणि जातानाची आठवण म्हणून अब्जावधी किमतीच्या नुकसानास कारणीभूत असणारे महापूर असल्या गोष्टी घेऊन येणारे महाप्रचंड झंझावात)" ह्या अमेरिकेसारख्या बलाढ्य (म्हणजे "बला" आणि "आढ्यता" ज्याच्यामध्ये कुटूनकुटून भरली आहे असा जो तो) देशाला लोटांगण घालायला लावणार्‍या गोष्टी आम्हा मराठीभूमीतील बांधवांच्या एवढ्या जंगी परिचयाच्या नाहीत. तसा परिचय वाढविण्याचे कारणही उद्भवत नाही ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मराठी माणसाकडे एक चिंतेचं कारण कमी असतं.

भूकंप ह्या प्रकाराला मराठी माणूस घाबरत नाही. संपूर्ण जग भूकंपाच्या भितीने आपल्या इमारती भूकंपापासून सुरक्षित करण्याच्या मागे पडले असते. त्यासाठी वर दोलक (पेंडयुलम डॅंपर) लावणे, इमरतीला बाहुलीसारखे डुलता यावे म्हणून लवचिक बनविणे, भूकंप झालाच तर काय करायचे हे लोकांना शिकविणे असे उद्योग करत असतात. पण आम्हाला असल्या कुठल्याही भूकंपतयारीची गरज पडत नाही. उलट आम्ही विटासिमेंटाची पक्की घरे बांधून भूकंप कधी होणारच नाही असल्या थाटात राहतो. त्याबाबतीत मराठी माणसाची हिंमत दाद देण्यासारखीच आहे.

आपण फार तर मान्सून च्या भेकड पावसाची रेनकोट आणि छत्र्या विकत घेऊन तयारी करतो. हा तसा नेहेमी लपंडावच खेळत असतो. त्यामुळे त्याला भिण्याचे कारणच नाही. मात्र लबाड मान्सून प्रत्येक प्रांतात वेगवेगळा मुखवटा घालून येतो. मुंबईत "म्मारो स्सालेको!" गुंडागर्दी कारभार शोभावा तसा दे दणाद्दन फिल्मी मसाला स्टाईलमध्ये दणदण येऊन पूर घेऊनच येतो. तसं त्या पुराचं अर्ध श्रेय पाण्यामध्ये माती टाकून समुद्रपातळीच्या खाली बसलेल्या मुंबापुरीला आणि उरलेले अर्धे श्रेय गावाला जाण्याची भरलेली बॅग गच्च भरून आतील कपड्यांच्या चिंध्या बाहेर लोंबकळतात तसल्या दिमकीत भरगच्च भरलेले मुंबई शहर सांभाळू न शकणार्‍या शासनाच्या भिक्कार गटार (ड्रेनेज) यंत्रणेला जाते. व्यवस्थेची मोडकळीस आलेली गाडी ही शासनाने आणि मुंबापुरीने स्वत:च उंच टेकडीच्या काठावर ओढत आणून ठेवावी आणि पावसाने येऊन हलकेच टिचकी मारून गाडी खाली दरीमध्ये ढकलून द्यावी असे येथील पावसाचे समीकरण असते.

पुण्यातला पाऊस "व्हेन इन रोम, डू ऍज रोमन्स डू" च्या हिशेबाने अस्सल तुरटसाखरू पुणेरीप्रमाणे बाहेर गोडेपणाचा आव आणून प्रत्यक्षात मात्र तिखटाची फोडणी असल्या ऐटीत वावरतो. बर्‍याचदा हा दिवसातनं एकदा हलकासा येऊन वातावरण आल्हाददायक करून जातो (माझा काही वर्षांपूर्वीचा अनुभव - आता पावसाची लहर वेगळी झाली असेल तर त्यात माझा हात नाही). याला छान म्हणावे तर सतत पडत असतो.

नागपूरात मात्र मान्सूनचा पाऊस ह्यासारखा बेभरवशाचा कोणी नसेल. कधी हा एक्सप्रेस मेलला दीडशेच्या वेगाने नेण्याकरता भडाभडा कोळसा ज्या वेगाने ओततात (तूर्तास संवादासाठी समजूत करून घ्या की ही एक्सप्रेस मेल सध्या कोळशाच्या इंजिनाने चालते!) तसा एक-दोन तासात ओतून जातो, तर कधी बाहेरगावाहून आलेल्या पण गेल्या आठवडाभरात जाण्याचे नावही काढले नसेल अशा पाहुण्यासारखा आठवड्याआठवड्याने तळ ठोकून बसलेला असतो. तर सांगण्याचे मुख्य कारण हेच की आपले निसर्गाला तोंड देण्याचे धारिष्ट्य हे असल्या दीडदमडीच्या पावसापर्यंतच सहसा ताणून धरण्यात येते. अमेरिकेत लोकं वादळाच्या स्वागतासाठी कशाकशाची तयारी ठेवत असतील?

क्रमशः

भाग १
भाग ३
भाग ४

Comments

Nandan said…
छान पवन, पाण्यासारखाच पाऊस जिकडे पडतो तिकडचे गुणधर्म आत्मसात करतो असे दिसते. तुम्हाला कुठला पाऊस पाहिजे - मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर? असा एक तुमच्या ब्लॉगवर येण्यास हरकत नाही.
Pawan said…
नंदन,
शब्दांचा पाऊस ह्या ब्लॉगवर अधूनमधून पडत राहीलच याची हमी मी देतो. तुम्हाला कुठला पाहिजे?

आपला,
- पवन
Anonymous said…
पवन,
अलीकडे पोट धरून हसवेल असा विनोद दुर्मिळ झाला आहे. सगळीकडे पांचटपणाचाच सुकाळ आहे.
या पार्श्वभूमीवर तुझा ब्लाग वाचून पुश्कळ दिवसांनी हसून मुरकुन्डी वळण्याचा अनुभव आला.
त्याबद्दल आभारी आहे.
या चुकीच्या जागी वेलान्ट्या पडण्याच्या प्रकाराला काही standard उपाय आहे का? तू केलेला non-standard इलाज सगळे करू शकत नाहीत. याची आणखी माहिती कुठे मिळेल?
दिलीप भागवत (bhagwat@afconsindia.com)
Pawan said…
दिलीप,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

standard उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या संगणक प्रणालीवर "Complex Script Support" संस्थापित करून घ्यावा लागेल. ह्याबद्दलची अधिक माहिती http://marathiblogs.net/font_problem येथे आहे.

- पवन

Popular posts from this blog

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

सावजी

नावात काय आहे?