Posts

Showing posts from 2005

सावजी

Image
सावजी म्हणजे नेमके कोण हा प्रश्न सोडवणे तसे किचकटच आहे. जसे आपले आचारी, सुतार, कुंभार, तसे सावजी हे पण कुठल्या जमातीचे नांव आहे काय असे मला उगाच वाटत असावे. "सावजी" हे एक आदरपूर्वक संबोधन म्हणून सुद्धा वापरल्या जाते; पुष्कळदा कवितेत. म्हणजे "या सावजी - घ्या सावजी, कसं काय रावजी" - वगैरे यमक साधण्याचा प्रकार साधायला कवई मोकळे. पण आमचा सावजी ह्या शब्दाशी संबंध मात्र "सावजी कोंबडी" ह्याच वाक्यातील प्रयोगाशी येतो. तुम्ही शाकाहारी असाल तर पुढचा संपूर्ण लेख हा अगदी जहाल मांसाहाराशी संबंधित आहे याची जाणीव असू द्यावी. मांसाहार हा आपला आवडीचा विषय नसेल तर समोरचे शब्द पालथी घालण्यापूर्वी जरा विचार करावा. नंतर म्हणू नका की सांगितले नाही म्हणून! तर, कोणी सावजी म्हटले रे म्हटले की आमच्यासमोर झणझणीत अस्सल रश्याची देशी (जिला गावराणी पण म्हणतात) कोंबडीची तिखट भाजीच येते. मोठ्या प्रेमाने आम्ही त्या भाजीला "सावजी चिकन" म्हणतो. आणि त्यांत तर खास कांडूण आणलेल्या लाल मिरचीच्या तिखटाचा आणि घरीच वाटून बनवलेल्या अस्सल मसाल्याचा सुळसुळाट झाल्याशिवाय तर काही मजाच येत नाही

अशी वादळे येती

नुकतेच "अशी वादळे येती" लेखाक्रमाचा शेवटचा भाग संपवला. ही नोंद या लेखमालिकेतील सगळे भाग खाली दिल्याप्रमाणे एकत्रित करण्यासाठी! अशी वादळे येती अशी वादळे येती - भाग १: शब्दांची चकमक अशी वादळे येती - भाग २: निसर्गाचे समीकरण अशी वादळे येती - भाग ३: अडचणीत अडचण अशी वादळे येती - भाग ४: माझं घर शेणाचं

अशी वादळे येती - भाग ४: माझं घर शेणाचं

दरवर्षीचा "हरिकेन सीझन" सुरु झाला की आग्नेयी राज्यांत आणि त्यातल्या त्यात फ्लोरिडा राज्यात मोठे वादळ धुमाकूळ घालणार हे शंभर टक्के ठरलेलेच असते. फ्लोरिडा हे निवृत्तीचे ठिकाण मानल्या जाते - म्हणजे अख्खे आयुष्य कर्म करून एकत्र केलेला पैसा घेऊन निवृत्त झालेले अमेरिकन पिकली पानं इथे मस्तपैकी घरं करून राहतात. महावादळाच्या जीवघेण्या रस्त्यामध्ये राहणारी ही "सीनियर" जनता "देवा, संपूर्ण आयुष्य झटून गोळा केलेल्या संपत्तीनेसुद्धा आता मनाला शांती मिळत नाही. तेव्हा लवकरात लवकर कुठले तरी 'हरिकेन (महावादळ)' पाठवून मला घेऊन जा रे बाबा!" म्हणत जीवावर उदार झालेली असावी अशी मला शंका येते. नाहीतर एवढी संपत्ती असल्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी "रिटायर" होण्यापेक्षा जेथे निसर्गाने रणधुमाळी माजवली आहे असल्या मढ्यात राहण्याच्या भानगडीत का बरे पडावे? या सगळ्यात एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या वादळांना दिलेली नावं. जागतिक हवामान संस्थेची चौथी प्रादेशिक 'हरिकेन कमिटी' अमेरिकेच्या आजूबाजूला निर्माण होणार्‍या वादळांना नावे देण्याचे काम करते. ज्याही व

अशी वादळे येती - भाग ३: अडचणीत अडचण

Image
अमेरिकेच्या हवामान खात्याचं काम अगदी चोख असतं. वादळ वारा यांना दुरूनच दिसत असतो. जर कुठले वादळ किंवा झंझावात येणार असे ह्या हवामान खात्याने सांगितले की ती दगडावरची रेघ होऊन जाते. तसेच सर्वसाधारणतः ज्यादिवशी पाऊस पडणार असे सांगितले की नव्वद प्रतिशत पाऊस पडणारंच. जेव्हा लख्ख ऊन सांगतात तेव्हा सूर्यही तळपत राहणार. किंबहुना अमेरिकन पाऊस, वारा या गोष्टी अमेरिकन हवामान खात्याला विचारूनच पुढचे कार्य आखत असावेत. आपल्याकडील वार्‍याचं आपण काही तरी बिघडवलेलं असणार. नाहीतर आपल्या देशीय शासनाच्या हवामान खात्याला हवा कुठल्या दिशेने वाहते याची खरोखरच हवा असती. मराठी बातम्यांमध्ये "आज लख्ख ऊन पडणार" अशी बातमी आली की आमचे देशी शेजारी नेमके त्याच दिवशी छत्री काढत. एकदा "उद्या भरपूर पाऊस" म्हणून दूरदर्शनच्या बातम्यांवरून कळलं. आमच्या शेजार्‍यांनी दुसर्‍या दिवशी छत्री नेलीच नाही. योगायोगाने त्यादिवशी मुसळधार पाऊस पडून शेजारी ओलेचिंब भिजले आणि पुढे आजारी पडले. नंतर बरे झाल्यावर हवामान खात्याच्या कार्यालयात जाऊन त्यांनी "काय लेकहो बेभरवशाचे तुम्ही!" म्हणून जो पहिला सापडला त्याच

अशी वादळे येती - भाग २: निसर्गाचे समीकरण

Image
मुसळधार पाऊस - त्यामुळे आलेला पूर, किंवा पाऊस न आल्यामुळे दुष्काळ, भूकंप असल्या अबला नैसर्गिक आपत्त्या आपल्याला महाराष्ट्रात अधुनमधुन खाजवून जातात म्हणून ओळखीच्या आहेत. "टोर्नाडो (प्रचंड महाभयंकर चक्रीवादळ)" आणि अमेरिकेतले "लेवल फाईव हरिकेन (म्हणजे आपल्यासोबत भेटीला दीडशे मैलांच्या अंदाधुंद वेगाने वाहणारी वादळे, धूमाधार पाऊस, सेक्युरिटी गार्ड सारखे नेहेमीच सोबतीला ठेवलेले अनेक टोर्नाडो आणि जातानाची आठवण म्हणून अब्जावधी किमतीच्या नुकसानास कारणीभूत असणारे महापूर असल्या गोष्टी घेऊन येणारे महाप्रचंड झंझावात)" ह्या अमेरिकेसारख्या बलाढ्य (म्हणजे "बला" आणि "आढ्यता" ज्याच्यामध्ये कुटूनकुटून भरली आहे असा जो तो) देशाला लोटांगण घालायला लावणार्‍या गोष्टी आम्हा मराठीभूमीतील बांधवांच्या एवढ्या जंगी परिचयाच्या नाहीत. तसा परिचय वाढविण्याचे कारणही उद्भवत नाही ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मराठी माणसाकडे एक चिंतेचं कारण कमी असतं. भूकंप ह्या प्रकाराला मराठी माणूस घाबरत नाही. संपूर्ण जग भूकंपाच्या भितीने आपल्या इमारती भूकंपापासून सुरक्षित करण्याच्या मागे पडले असते

अशी वादळे येती - भाग १: शब्दांची चकमक

Image
काही दिवसांपूर्वीच एका संभाषणात "त्सुनामी" हा विषय निघाला. कुणीतरी एक प्रश्न विचारला की "त्सुनामी" ला मराठी प्रतिशब्द कुठला? मी जरा डोक्याची खाजवाखाजव केली; पण खरंच, मला "त्सुनामी" ह्या अर्थाचा बोली भाषेत "भली मोठी प्रचंड लाट" ह्याखेरीज दुसरा कुठलाही शब्द आठवला नाही (तुम्हाला माहित असेल तर सांगा). खरं तर बोली भाषेत तेच शब्द वापरले जातात जे खरंच बोलण्यात असतात; आणि बोलण्यात ते शब्द असतात जे अनुभवात असतात. त्सुनामी हा शब्द जपानी भाषेतून येतो. जपान ह्या देशाच्या समुद्रकिनारी त्सुनामी नाविक रंभा, मेनका नेहेमीच नृत्यथैमान घालत असतात. त्यामुळे त्यासाठी तसा विशिष्ट शब्द वापरात येणे हे साहाजिकच आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र असला प्रकार क्वचितच(गरीबाच्या घरी कसल्या हो रंभा आणि मेनका?). त्यामुळे मूळ मराठीतून ह्यासाठी बोली शब्द प्रचलित नसावा... हीच गोष्ट चक्रीवादळाची. आपल्याकडे वापरात असणार्‍या "चक्रीवादळ" ह्या शब्दाची शक्ती वादळ हे खरोखर केवढ्या प्रचंड जोमाचं असू शकतं हे सांगायला हास्यास्पद रित्या अपुरी पडते. अमेरिकेतल्या "टोर्नाडो" प

मी रंगलेला

'सोनेरी केसांनी मढलेली, पिवळी मादक साडी घातलेली, डोक्यात सुंदर पिवळा गुलाब खोचलेला आणि गोरा रंग तिच्या त्या पिंगट अभिव्यक्तीला फिक्का पाडेल अशी काया असणारी अतिशय उन्मादक सौंदर्या ती नुकतीच धबधब्यातनं केसं पुसत बाहेर आली. भान हरपून तिच्याकडे बघत असतानाच मी हात पुढे केला आणि तिला मी उभा असलेल्या प्रचंड शिळेवर येण्यास मदत केली. लगेच कुठूनतरी कुजबुजल्या आवाजात हलकेच आकाशवाणी झाली "...तूर साबुन आपके गोरे रंग को निखारे..". ते सौंदर्य पाहून देव सुद्धा बरळायला लागला होता. अगदी सुंदर पाण्याचा डोह, कडेला तो अतिउंच धबधबा, सभोवताली सुंदर वनराई, मध्ये गोलाकार मऊ शिळाखंडांच्या माळा आणि निरभ्र आकाश असल्या देखव्यातून मी तिचा हात हातात धरून पळत चाललो होतो. तिथे समोरच हिरवागार गालिचा पसरल्यासारखा सुंदर बगीचा होता. तिथे आम्ही धाप लागून बसतो नं बसतो तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाहाता पाहाता मी मुग्ध होऊन गेलो. "छलके तेरी आंखोंसे शराऽब औऽर जियादा" हे गीत माझ्या प्राणवायूत शिरल्यासारखे बाहेर पडू लागले. कधी हातात हात घालून तर कधी एकमेकांमागे असे आम्ही बागेत विहरू लागलो. भ्रमंती करता करता

नावात काय आहे?

नावात काय आहे? बर्‍याच वर्षांपूर्वी जो कोणी (नक्की कोण हा प्रश्न गौण आहे) हे वाक्य म्हणून गेला, तो म्हणून गेला खरा, पण सगळ्या जगताला एक वादाचा विषय देऊन गेला. मी पुष्कळ वेळा "नावात काय आहे" ह्यावरचा वाद टाळत असतो. कारण "नावात काही नाही" आणि "नावातच सगळे काही आहे" अशा दोन्ही बाजूंनी पटवून देणारे पुष्कळ महाशय असतात. आमेरिकेत आल्यानंतरच कळले कि यांपैकी कुठ्लीही बाजू घेण्याकरता अनुभव असावा लागतो. कुठलीही बाजू का होईना, ती पटायला स्वतःच्या नावाचा कुणीतरी खेळ केलेला असायला लागतो. तोच खेळ किती तरी वेळा चाललेला असतो या देशात! माझ नाव पवन. अख्ख्या मराठीत सगळ्यात सोपी अशी "पवन, मदन, नयन" ह्यांच्याशी यमक जुळणारी आणि काना मात्रा नसणारी दुसरी नावे नाहीत. पण अमेरिकन माणसे म्हणा किंवा बाया म्हणा, एक दोन वगळले तर एवढे सोपे नाव बरोबर बोलवून दाखवेल असा एकही जण सापडणार नाही. ह्या प्रकरणाची सुरवात एका होटेल मॅनेजर पासून झाली. इथे लोकांची नावे "Rachel" ला "रेचल", "Aaron" ला "एरन", "Cary" ला "केरी" अशी उच्चार