काही गोष्टी, काही गमती ........

Sunday, January 15, 2006

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

या भागाला दिलेले नाव वाचून "तेलुगु देसम" राजकीय पक्षाशी येथे काही संबंध आहे काय असा तुम्हाला एक सहज प्रश्न पडला असेल तर मी तुमची ती शंका संपूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणार नाही. फक्त एक सुधारणा - लेख राजकीय पक्षाशी संबंधित नसून ऑफिसमधील संपूर्ण तेलुगु देशबांधवांची प्रशंसा आणि उदोउदो आहे.

तुम्हाला आतापर्यंत कळले असेलंच की मी ज्या ऑफिसमध्ये जातो (कशासाठी जातो, काय करतो, किती वेळ करतो हा वेगळा विषय आहे - तो आपण पुन्हा कधीतरी उगाळून काढू!) ते ऑफिस अमेरिकेतील एका बर्‍यापैकी चालणार्‍या कंपनीचं माहितीतंत्रज्ञान विभागाचं ऑफिस आहे. अमेरिकेला अर्थार्जनाकरिता आलेल्या अनेक भारतीय देशबांधवांपैकी बरेच लोकं इथे काम करतात. फक्त ह्या काम करणार्‍यांपैकी एका भल्या मोठया समूहाचे अर्थार्जनाव्यतिरिक्त 'स्थलांतरण' हा एक गुपित उद्देश्य असतो. असो बापडा! ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे राहावे; मरेस्तोवर राहावे. यांत भारतातील प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधी तर आहेतच, पण कुठल्या प्रांतातील प्रतिनिधींचे प्रमाण किती आहे यामध्ये मात्र बरीच तफावत आहे. आमच्या ऑफिसमध्ये काम करणार्‍या भारतीयांपैकी फार तर वीस टक्के प्रतिनिधीत्व मराठी, तामिळ, कानडी, मळयाळी, पंजाबी, उत्तर भारतीय आणि इतर हिंदी भाषिक, बिमारू (बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश) राज्यांतील रत्ने व बंगाली यांचे मिश्रण आणि बाकीचे सगळे गुजराती अशा सगळ्या प्रांतांमध्ये विभागिले गेले आहे. उरलेले ऐंशी टक्के प्रतिनिधीत्व आंध्र प्रदेशातील होतकरू तेलुगुंना मिळालेले आहे. म्हणजे "अनेकता मे एकता", 'हम पंछी एक डाल के" वगैरे जे काही भारतीय विभिन्नतेमध्येदेखील ऐक्याबद्दलचे वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत, त्याचा तंतोतंत प्रत्यय ह्या आमच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये येतो. फक्त एकूण शंभर डाळी असणार्‍या ह्या झाडाच्या ऐंशी डाळ्यांवर तेलुगु पंछीच बसलेले दिसतात!

तसे तेलुगु बायामाणसे वेगवेगळ्या विभागात, प्रकल्पात विखुरलेली आहेत. पण ऑफिसमधील एका मोठ्या संगणक आज्ञावली प्रकल्प विकसन पक्षामध्ये (सॉफ्टवेअर डेवलपमेंट प्रोजेक्ट ग्रुप) 'विखुरणे' या शब्दाचा अतिरेक झालेला आहे. इथे फक्त तेलुगुच तेलुगु (अक्षरशः) विखुरलेले असतात. या पक्षातील संगणक आज्ञावली लिहिणारे, तपासणारे सगळेच वीस-पंचेविस कर्मचारी आपले तेलुगु देशबांधव आहेत. याला एकही अपवाद नाही. येथील औद्योगिक विश्लेषक (बिजनेस ऍनालिस्ट) देखील तेलुगु. प्रकल्प सूत्रधार (प्रोजेक्ट मॅनेजर) सुद्धा तेलुगुच असल्यामुळे सगळ्या कर्मचार्‍यांना सांभाळणे आणि त्यांना त्यांच्या अखत्यारित ठेवणे फार सोयीचे पडते. आता कंपनीच्या उच्च अधिकार्‍यांचे विचार, प्रकल्प गरजा, आदेश इ॰ योग्य रीतीने आणि समजणार्‍या भाषेत प्रकल्प कर्मचारी, विश्लेषक आणि सूत्रधार यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य अति महत्त्वाचे असल्यामुळे प्रकल्प अधिकारी (डायरेक्टर) पण तेलुगु असणे साहाजिकच आहे. पक्षात जेव्हा नवीन कर्मचार्‍याची जागा निघते तेव्हा तो कर्मचारी तेलुगुच असला पाहिजे असा ह्या पक्षाचा अलिखित नियम आहे.

बरे, ह्या कर्मचार्‍यांच्या जागांपैकी कुठली जागा ही संगणक आज्ञावली कार्यक्रम गुण तपासका (क्वालिटी कंट्रोल टेस्टर) साठी असेल आणि त्या दैवी कामासाठी कोणी सापडला नाहीच तर एखाद्या पक्ष कार्यकर्त्याच्या काही वर्षांपूर्वी संगणाकाचा कुठलातरी कोर्स केलेल्या पत्नीला पाचारण केले जाते. गेली दहा वर्षे अमेरिकेत राहून "आय डिड वेन्ट शॉपिंग टुमारो" असल्या सुंदर इंग्रजी बोलणार्‍या ह्या ललनेला क्वालिटी कंट्रोल नामक संगणक प्रक्रियेचे 'अ' का 'ठ' माहित नसते. पण येथे कसलीही आडकाठी येत नाही. इतर तेलुगुभाषिक 'गारु' लहानसहान गोष्टींमध्ये हिची मदत करायला नेहेमी तत्पर असतात. 'गारू' हे तेलुगु संबोधन आपल्या मराठीतले 'साहेब' या सारखे वापरले जाते - म्हणजे 'रावसाहेब', 'बाईसाहेब' वगैरे. तर, तुम्ही 'गारु' आम्ही 'गारु', दोघे मिळून राज्य करू असल्या थाटात हे काम चालले असते. क्वालिटी कंट्रोल कशाशी खातात हे सुरुवातीला माहित नसणारी (आणि कदाचित लोणच्याशी खात असावेत अशी समजूत असणारी) ही महिला काही महिन्यांत क्वालिटी कंट्रोलच्या कामात तरबेज होते. हा प्रकल्प प्रसिद्ध (म्हणजे प्रोजेक्ट रिलीज) झाल्यानंतर त्यामध्ये असणार्‍या काही घोडचुका अगोदरच का नाही पकडता आल्या ही एक न उलगडलेली मोठी बाब आहे. त्याचे कारण काय बरे असावे यावर उच्च अधिकार्‍यांच्या अजूनही लांब बैठका होत असतात.

मला बरेच मित्र विचारत असतात की ह्या पक्षामध्ये कुठली नोकरीसाठी जागा असेल तर आम्हाला कळव. माझा त्यांना पहिला प्रश्न असतो,
"बाबानो, तुम्हाला तेलुगु लिहिता-वाचता येते काय?"
"नाही"
"अरे मग कशाला खटपट करतोस एवढी? तुला तेलुगु येत नाही तर ते तुला घेणार नाहीत."
"अरे पण मला तेलुगु पाढे म्हणता येतात!"
"असं काय! मग प्रयत्न करून बघ."
मला त्यांचा उत्साह खच्ची करायचा नसतो.

अशीच खटपट करून एका मराठी मित्राने शेवटी पक्षाचे तिकीट मिळविलेच. त्याचे कारण त्या मित्राची खटपट नसून एका विशिष्ट कौशल्यसंचाचा (स्किलसेट) कुठलाही 'गारु' त्यांना सापडला नव्हता हे होते. त्या मराठी मित्राचे अभिनंदन करायला म्हणून मी एका आठवड्याने त्याच्याकडे गेलो तर तो जरा दु:खी दिसला. मी विचारले,
"काय झाले? तुला पाहिजे त्या पक्षात नोकरी तर मिळाली. असा रडका चेहेरा करून काय बसलास?"
"अरे डोंगर दूरूनच सुंदर दिसतात ते खरे आहे."
"का? अरे त्या पक्षातील माणसे तर फार मनमिळाऊ आहेत!"
"तोच तर प्रश्न आहे."
"म्हणजे?"
"अरे ती जनता इतकी मनमिळाऊ आहे की पक्षांच्या तांत्रिक बैठकांमध्ये सुद्धा तेलुगुचाच वापर करतात. आता दोन दिवसापूर्वीच प्रकल्पाच्या एका नवीन घटकासाठी आमची बैठक होती. त्यामध्ये चांगले दोन तास सल्लामसलत झाली आणि शेवटी त्यांनी मला ते ज्या निर्णयाप्रत पोहोचले ते काम करायला दिले."
"त्यांत वावगं काय आहे?"
"त्यांनी मला फक्त 'तू हे काम करशील का?' हेच इंग्रजीमध्ये विचारले."
"मग?"
"बाकी सल्लामसलत आणि शेवटचा निर्णय हे सगळे तेलुगुमध्ये झाले ना! मला कुठले काम करायचे आहे ते कळायला तर पाहिजे!"
'तरी मी म्हणत होतो' असे म्हणायची पोटात जबरदस्त कळ उठली असताना देखील मी स्वतःला आवर घातला. मी त्याला सांभाळण्याच्या आवेशात म्हटले,
"अरे मग प्रोजेक्ट मॅनेजरला विचारून इंग्रजीमध्ये समजून घे की कशावर काम करायचे आहे ते."
"ते सगळे ठीक आहे, पण पुढे आणखी एक अडचण आहे."
"कुठली?"
"प्रकल्पाचा अगोदरचा कोड जरा विचित्र आहे. त्या प्रोग्रामांमध्ये ज्या कॉमेंट्स असतात ना, त्या सुद्धा तेलुगुमध्ये आहेत!"
अरे माझ्या रामा! माझ्या एका तमिळ सहाकार्‍याची 'हे लोकं डेवलपमेंटसुद्धा तेलुगुमध्येच करीत असावेत!' ही शंका तंतोतंत खरी उतरलेली बघून मी माझ्या डोक्यावर हात मारला.
"तरी मी तुला म्हणत होतो!", माझ्याच्याने शेवटी राहावलं नाही हो!

तरी सगळीच तेलुगु रत्ने ह्या एका पक्षातच एकवटलेली आहेत अशातला भाग नाही. बर्‍याच स्वतंत्र उमेदवारांची अधूनमधून गाठभेट होत असते. त्यांपैकी एक म्हणजे वर्गणीबहाद्दर. हा माणूस जेव्हाकेव्हा समोरून जातो तेव्हा अगदी खप्पड चेहेर्‍याने. ह्याला "गुड डे" म्हणावे तरी हा मनुष्य परत संबोधित करीत नाही. माझ्याशी काही देणेघेणे नकोच आहे असे ह्याच्या चेहेर्‍यावरून दिसते. पण कुठल्या का साईबाबाच्या मंदिरासाठी वर्गणी गोळा करायची म्हटली की हा माणूस अगदी "हसर्‍या" चेहेर्‍याने माझ्या कक्षेत येऊन वर्गणीकरिता पृच्छा करतो. हा माणूस हसताना दिसतो कसा हे आजवर अवगत नसलेल्या मला पहिल्यांदा त्याच्या भाऊबांधिलकीचे दर्शन घडते. 'मतलबी!', मी त्याला मनात शिव्या मारत दहाएक डॉलरची नोट त्याच्या हातावर ठेवतो. दुसरे एक लबाड रत्न आहे. ह्या माणसाच्या चेहेर्‍यावर "मी अतिशय महामूर्ख आहे आणि मला काही एक कळत नाही" हा भाव सदैव असतो. गुप्तपणे काम काढून घेणे आणि काही घडलेच नाही अशा थाटात वावरणे ह्याचे कौशल्य ह्या माणसात कुटूनकुटून भरले आहे. ह्याच्या गटातील मरमर करून काम करणार्‍यांना पगारवाढ सोडून ह्यालाच बढतीवर बढती का मिळते हे एक न सुटलेले कोडे आहे. आणखी एक महाभाग संपूर्ण कार्यालयाची इमारत आपले घर आहे आणि मोबाइल फोनवरून मोठ्यामोठ्याने कुटुंबियांशी तेलुगुमध्ये बोलत बोलत अख्ख्या माळ्यावरती येरझारा घालणे हा आपला नौकरीसिद्ध अधिकार आहे अशी स्वतःची समजूत करून बसले होते. ह्यांच्या येरझारा सुरू असताना त्या माळ्यावरील एकही मनुष्यप्राणी आपले काम करू शकत नाही हे पाहून उच्च व्यवस्थापनाने त्याच्या डोक्यात फरक पडला आहे म्हणून त्यास शेवटी काढून टाकले.

काही जण एवढ्या तीव्र आठवणींचे नसतात. तरीही आंध्रभाषिकांच्या बोलण्यातील काही उद्गारवाचक वाक्प्रचार डोक्यात घर करून राहतात. त्यापैकी एक म्हणजे "हौ नाऽऽऽऽऽ". येताजाता जर कुण्या तेलुगुभाषिकाच्या टेलिफोनवरच्या संभाषणामध्ये "हौ नाऽऽऽऽऽ" कानावर पडले तर त्या कक्षाच्या बाजूला जरा वेळ हळूच थांबावे, पुन्हा काही सेकंदात एखादा "हौ नाऽऽऽऽऽ" ऐकायला मिळेल. पुन्हा थोड्या वेळाने आणखी एक "हौ नाऽऽऽऽऽ". "हौ नाऽऽऽऽऽ" हा उद्गार कधी एकट्याने येत नाही. त्याच्यासोबत आणखी दोन-चार "हौ नाऽऽऽऽऽ" असावे लागतात हा माझा अनुभव आहे. पहिल्यांदा "हौ नाऽऽऽऽऽ" ऐकणार्‍या मराठी माणसाची प्रतिक्रिया "हे काय भलतंच!" अशी निघण्याची हमखास शक्यता असते. श्वास धरून उडी मारताना उच्चारलेले "हौ" आणि नंतर "ना" असे ओरडून मरण पावणार्‍या माणसाच्या शेवटच्या श्वासासोबत निघणारा "नाऽऽऽऽऽ" असा दूर विरत जाणारा आवाज, असला विचित्र उच्चार असणारे हे उद्गार आहे. "सीईंग ईज बिलीविंग" (म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी बघायलाच पाहिजे) ह्या इंग्रजी म्हणीसारखेच "हिअरींग ईज बिलीविंग" (म्हणजे विश्वास ठेवण्याकरिता ऐकायलाच पाहिजे) केल्याशिवाय "हौ नाऽऽऽऽऽ" ची मजाच येत नाही. हैदराबादने "हौ नाऽऽऽऽऽ" ही जगाला दिलेली एक अनमोल भेट आहे; आणि आंध्रभाषिकांनी दिलेली आमच्या कार्यालयाच्या इमारतीला!

तेलुगुभाषिक असे कुठल्या पक्षात एकत्र असूदेत किंवा इकडेतिकडे विखुरलेले असूदेत, सामाजिक कार्य करायचे म्हटले की ही सगळी मंडळी एकत्र आल्याशिवाय राहात नाही. दिवाळीचा कार्यक्रम हा असल्याच कार्यांपैकी एक. ह्यात इतर प्रांताच्या भारतीयांनासुद्धा भाग घेता येतो. उदाहरणार्थ, मागच्याच वर्षी झालेल्या दिवाळीच्या कार्यक्रमासाठी बॅनर छापून आणण्याचे काम माझ्याकडे 'माहिती चक्ती' (कंपॅक्ट डाटा डिस्क) वर सोपविल्या गेले होते. मी ते बॅनर छापून आणेपर्यंत त्यावर "हॅप्पी दिवाली" असे इंग्रजीमध्ये आणि त्याखाली "शुभ दीपावली" असे तेलुगुमध्ये लिहिले होते याचा मला गंध नव्हता. असो. तेलुगु ही सुद्धा एक भारतीय भाषाच आहे म्हणून मी त्याकडे कानाडोळा केला. पण कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा "ही दिवाळी आपणां सगळ्यांना सुखाची जावो" असल्या आशयाच्या तेलुगु गाण्याने झाली. शेवटी काही स्पर्धेमध्ये विजेत्या आमच्या "एरिक" नामक अमेरिकन सहकार्‍यास मिळालेले पारितोषिक देखील "टू एरिक गारु" असल्या थाटात वितरण्यात आले. माझ्या बर्‍याच अमेरिकन सहकार्‍यांची "भारताची राष्ट्रीय भाषा 'तेलुगु' आहे आणि 'मराठी', 'हिंदी' ह्या भाषा तेलुगुच्या बोली आवृत्त्या (डायऍलेक्ट) आहेत" अशी एव्हाना समजूत झाली होती. एवढे सगळे दिव्य बघितल्यावर मी त्यांना खोटं का ठरवू?

आमच्या कार्यालयाच्या इमारतीत असणार्‍या शेकडो देशबांधवांपैकी (यापैकी बर्‍याच जणांनी अमेरिकेचे नागरीकत्व पत्करल्याने ते नेमके कोण हा एक बिकट प्रश्न उद्भवलेला आहे!) फार तर मोजून दहा-पंधरा लोकं मराठी आहेत. यामध्ये सुद्धा त्यांच्यापैकी बर्‍याच जणांशी मराठीत बोलायला जावे तर उलटे उत्तर इंग्रजीत ऐकायला मिळते. अशा वेळेस मला हळहळ वाटते की आपले संबंध ह्या आंध्रच्या लोकांसारखे का नाही होत. चुंबकामध्ये असणार्‍या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांपैकी उत्तर ध्रुवाला उत्तर ध्रुव अपकर्षित करतो किंवा दूर ढकलतो. त्याप्रमाणे आमच्या इमारतीतील मराठी इसमांचे आहे. त्यांत चुकून एखादा दक्षिण ध्रुव असणारा निघतो आणि त्याच्याशी आपली छान गट्टी जमते. तेलुगु लोकांमध्ये मात्र ध्रुवच नसतो हे आता मला कळले आहे; आणि तेच कदाचित त्यांच्या सर्वत्र एकसारख्या सामाजिक बांधिलकीचे कारण असावे. माझे तेलुगुभाषिकांशी वाकडे आहे असा समज करून घेऊ नका. उलट तेलुगुभाषिक जनता ही फार मनमिळाऊ असते असे माझे मत आहे - फक्त तुम्हाला तेलुगु यायला पाहिजे. म्हणून मला ऑफिसात कोणी 'गारु' दिसला तर मी त्याला दूरूनच तस्मै आंध्रभाषिकाय नम: म्हणून नमस्कार घालतो आणि आपली वाट पकडतो.

क्रमशः

Wednesday, January 11, 2006

ऑफिस - भाग १ : अमेरिकन बायका

आजकाल मला ऑफिसला जायची भीती वाटते. म्हणजे एकदमच घाबरलेलो आहे वगैरे प्रकार नाही; फक्त त्या ठिकाणी जायला जरा मनाची तयारी करावी लागते इतकंच.
का विचाराल तर तशी कारणे पण बरीच आहेत. सगळ्यात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे काही अमेरिकन बायका. या बायकांनी माझी झोप उडविली आहे.

गैरसमज करून घेऊ नका; मी ऑफिसमध्ये जाऊन झोपतो अशातला भाग नाही; किंवा, या बायकांसोबत माझी प्रेम प्रकरणे सुरु आहेत असलंसुद्धा काही नाही. या बायकांची कार्यालयीन कक्षे (क्युबिकल) माझ्या कक्षाला लागून आहेत. ह्या कक्षांच्या भिंती ह्या फार तर सहा फुटाच्या उंचीच्या आहेत आणि छत मात्र दहा फूट वर आहे. त्यामुळे ह्या बायका जो काही गोंधळ घालतात तो त्या कक्षेमधून या कक्षेमध्ये सर्रास येण्याला कसलीही आडकाठी नाही.

सर्वप्रथम माझ्याच कक्षाला लागून असलेल्या पलीकडच्या ओळीमधील कक्षेतल्या बाईची गोष्ट. एक मध्यमवयीन, जरूरीपेक्षा जास्त अंगकाठी, घटस्फोट झालेला आणि एका म्हाताऱ्या आईला व किशोरवयीन मुलीला सांभाळण्याची जबाबदारी असलेली ही बाई. पहिल्या दोन गोष्टी सोडून बाकीच्या दोन गोष्टी मला कशाकाय माहित झाल्या असाव्यात याचा अंदाज तुम्हाला समोरच्या लिखाणात येईलंच! हिचा दिवसातून सगळ्यात प्रिय कार्यक्रम म्हणजे टेलिफोनचे पारायण. ऑफिसच्या डेस्कवरचा फोन आणि मोबाईल ह्या दोन्ही गोष्टी हिच्या जिवाभावाच्या आहेत. जर टेलिफोन नामक गोष्ट अस्तित्वात नसती तर ह्या बाईने कधीच आपला जीव देऊन जगाचा निरोप घेतला असता अशी माझी समजूत झाली आहे. तर हिच्या टेलिफोन प्रेमाने माझं काय एवढं बिघडवलंय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो, तेही सांगतो.

या बाईचे मागचे पुढचे सगळेच हिच्या मोठ्या खरखरीत आवाजातील टेलिफोन संभाषणांद्वारे कळते. ऑफिसला आल्यावर हिचा ठरलेला फोन लागतो तिच्या एका मैत्रिणीला. दोघी मिळून आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. वर कुठल्याशा अखंड चालत असणाऱ्या अमेरिकन मालिकेमध्ये घडलेल्या घटनांना आठवून आठवून त्या आठवणींचा चोथा करतात. म्हणजे याने तिच्याशी लग्न का केले नाही, तिने त्याला का बरे लाथाडले? तो तिला का बरे सोडून गेला? असल्या सगळ्या प्रश्नांची शहानिशा होते. मी आयुष्यात या टी.व्ही मालिकेचा चुकूनही एक भाग बघितला नाही. पण मी तुम्हाला त्या मालिकेतील नायक, नायिका पात्रांची नावे, त्यांची लग्ने, घटस्फोटे, त्यांच्या कुठल्या “डेट” कशा गेल्या, कोणाची आजी मरायला टेकलेली आहे, कोणाची बायको कर्करोगाने आजारी आहे, मग त्याचे कोणा दुसरीसोबत कसे संबंध असतात हे सगळे इत्थंभूत सांगू शकतो.

सकाळी काम करायची छान वेळ असते हो. पण ह्या मालिकापुराणामुळे माझं कामात लक्षच लागत नाही. मला अजूनही कान बंद करून काम करायची विद्या अवगत नाही. त्यामुळे ही माझी ठरलेली सकाळची दुविधा असते. म्हणून मी जरा उशिरा कामावर जाणे सुरु केले आहे, जेणेकरून मला सकाळी उठायची गरज नसते. लोकांना विश्वास बसत नाही की माझे रोजचे उशिरा ऑफिसमध्ये येण्याचे कारण मी स्वत: उशिरा झोपेतून उठतो हे नसून ह्या बायकांचे प्रभातकाव्य आहे. ते असो. सकाळचा त्यानंतरचा एक तास ह्या बाया छान काम करतात - सगळं कसं शांत शांत असतं. तीच माझी खरी कामाची वेळ. त्यात काम झाले तर झाले.

एका तासानंतर मात्र ह्या टेलिफोनप्रेमिकेचा नवीन अंक सुरु होतो. महिन्यातील सगळ्या दिवसांपैकी कुठल्या दिवशी कुठले काम काढावे हे तिचे ठरलेले असते. कधी घराच्या डागडुजीची व्यवस्था करण्यासाठी “हॅंडिमॅन” व्यवसायीकांना फोन लागतो. घरात कुठलं दार किर्र वाजतंय, कुठलं भिंतीतलं कपाट हलतंय, बेडरूमच्या खिडकीच्या काचा कशा फुटल्या, तिच्या घराच्या मागे असणाऱ्या हिरवळीतील गवत कापण्यासाठी मजूरांना लागणाऱ्या पैशांपेक्षा स्वत: ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केंस कापून घेणे तिला किती परवडेल असल्या सगळ्या तपासण्या, सुधारणा आणि त्यासाठी वेळ ठरवण्याचा हा कार्यक्रम असतो. कधी हिचा फ्रीज खराब झालेला असतो, तर कधी वॉशिंग मशिनमधून विचित्र आवाज येत असतात - आणि अक्षरशः आवाज कसा येतो त्याचे एक हुबेहूब प्रात्यक्षिक देखील ही बाई त्या फोनवरच्या मेंटेनन्सवाल्याला करून दाखवते. ते प्रात्यक्षिक ऐकून ह्या बाईमध्ये हॉलिवूडमधील सिनेमांमध्ये पार्श्वध्वनी देण्यासाठी लागणारे कौशल्य असताना तिकडे जायचे सोडून ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटची बरबटलेली नोकरी का करते हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. बरे, ह्या मेंटेनन्सच्या वेळा ठरवण्याकरिता जर योग्य कारण नसेल तर मग घरी आदल्या दिवशी आलेल्या सुधारकाच्या कामाचे गुणगाण करण्यासाठी किंवा खरडपट्टी काढण्यासाठी आणखी एका मैत्रिणीकडे फोन केला जातो. मग त्या मैत्रिणीलासुद्धा तिच्या स्वैपाकघरामध्ये कार्य काढायचे असल्यामुळे त्या स्वैपाकखोलीच्या फरशा बदलणाऱ्या उत्तम गवंड्याकडे मैत्रिणीच्या कार्यासाठी वेळ ठरवण्यासाठी फोन करण्याची तसदी घेतली जाते. मोठ्या मोठ्या व्यवसायीकांचा धंदा चालतो की बुडतो हे प्रामुख्याने ह्या बाईच्या शिफारशीवरूनच ठरवल्या जाते.

आणखी एक तापाची गोष्ट म्हणजे पलीकडच्या ओळीतल्या त्या बाईची एक मैत्रिण माझ्या अलीकडच्या ओळीत आहे. मी आहे आपला दोघींच्या मध्ये. या दोघींना एकमेकांशी बोलायला एकामेकांच्या कक्षेत जाणे जमत नाही. माझी शेजारणी तिला फोनवरच “अगं त्या नॅन्सीचं काय झालं माहिती आहे का?” असल्या विषयावर चर्चा करण्यासाठी साकडं घालते. मी मध्ये असल्यामुळे मला दोन्ही बाजू ऐकणे भाग पडते. जर तुम्हाला कुठल्या माणसाला मोठी शिक्षा द्यायची असेल, तर मी माझा कक्ष त्याच्यासाठी खाली करून द्यायला एका पायावर तयार आहे. एका दिवसात तो मनुष्य स्वतःचे कान कापून तुमच्या पायाशी लोटांगण घालतो की नाही हे बघाच!

दुपारच्या वेळेला शाळेतून परत घरी आलेल्या हिच्या किशोरवयीन मुलीची विचारपूस करण्यासाठी घरी जातपर्यंत थांबणे मात्र फार कठीण होत असावे. त्यामुळे दुपारीच फोन करून, घरी व्यवस्थित पोहोचली काय? आज शाळेत काय झाले, कुठला होमवर्क मिळाला, कुठल्या विषयात किती गुण मिळाले, त्यावर आणखी; गुण कमी का मिळाले? अभ्यास बरोबर करत नाही, मूर्खपणा कधी सोडशील, संध्याकाळी काय पाहिजे स्वैंपाकात, वगैरे वगैरे सवालजवाब होतात. तिच्या घरातील कन्यापुराण इथपर्यंतच मर्यादित राहात नाही. ती मैत्रिणींशी फोनवर बोलताना बऱ्याच तपशीलवार गोष्टी ऐकण्यात येतात. मला आता माहिती असणाऱ्या गोष्टींमध्ये तिच्या मुलीचे वय काय, मुलीचे नाव काय, मुलगी कितव्या इयत्तेत शिकते, मागच्या वर्षी एका विषायात मुलीला पैकीच्या पैकी मार्क मिळता मिळता कसं काय राहून गेलं, मुलीची पहिली “डेट” कशी झाली, दोघी मायलेकींचा आवडता टी.व्ही कार्यक्रम कोणता, येणाऱ्या आठवडी सुट्टीला कुठल्या जत्रेत जाणार आहेत, मदर्स डे साठी मुलगी आईसाठी काय भेट घेण्याचा विचार करते आहे आणि ते त्या आईला कसे गुप्तरित्या माहिती झाले, दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या बापबेटी भेटीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुलगी पुढच्या वीकेंडला तिच्या आईपासून विभक्त वडिलांसोबत कुठल्या ऑपेराच्या कार्यक्रमाला जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची भर पडली आहे.

बरे, आजतागायत चाललेले हे पुराण रोज नवे रूप धारण करत असे. रोज नवनवीन विषय चर्चिले जात. त्यामुळे कंटाळा येत नव्हता. पण इतक्यात एक नवीन गोंधळ सुरू झाला होता. ह्या माझ्या शेजारणीने नुकतीच युरोपची सहल आपल्या मुलीसोबत फत्ते केली होती. त्यामुळे बाकी साऱ्या विषयांना कलाटणी मिळून फक्त युरोपमधील स्कॉटलंड आणि इंग्लंड येथील प्रवासवर्णनाची पारायणे सुरु होती. त्यांत दिवसांतून कमीत कमी तीन नवीन मैत्रिणींना फोन करून युरोपची सहल कशी झाली याची कदा-न्-कदा माहिती पुरवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये लंडनचे पाऊंड ह्या चलनामध्ये विकत मिळणारे फास्ट फूड किती महाग आहे, स्कॉटलंडची एक झुकझुकगाडी कशी दऱ्याखोऱ्यातनं जाते आणि त्या गाडीमधून दूर खाडी दिसत असतानाचा देखावा किती सुंदर असतो, हॉटेलच्या रिजर्वेशनचे काय लफडे झाले, लंडनमध्ये बसचा कुठला पास घेतला, आमच्याच ऑफिसातील एका गृहस्थाची अचानक कशी तिथे गाठभेट पडली इत्यादींचा तपशील तर होताच, पण त्यासोबत दोघी मायलेकी कशा एकामेकांच्या जवळ आल्या आणि कसे नवीन जिवाभावाचे बंध तयार झालेत वगैरे (माझ्या दृष्टीने) अतिशय वैयक्तिक पातळीवरची माहितीसुद्धा ऐकायला मिळाली. एकदा सांगती तर काही अडचण नव्हती. पण प्रत्येक वेळेस न चुकता सगळा तपशील देणे नित्य सुरु होते. त्यावर कधी कोणी तिच्या कक्षेत येऊन “अरे वा, सहलीवरून परत आलीस वाटतं. कशी झाली सहल?” म्हणून डोकावयाचे. या महाशयांचे काय जाते एकदा ऐकायला? मी आपला तोच तो तपशील अगोदर चाळीसवेळा ऐकून होतो. शेवटी मला ती माहिती इतकी पाठ झाली की जर ती बाई जागेवर नसताना कुणी मला येऊन विचारले असते की ती कुठे गेली तर मी तिची युरोपची सहल कशी झाली हे सुद्धा एकही मजकूर न सोडता संपूर्ण बरळले असते. पण तेच ते ऐकून जाम वैतागलो होतो हे खरे. म्हणून मी काही उपाय करायचे ठरवले. त्यांत मोठ्यामोठ्याने कानात गाणी वाजवण्यासाठी एम.पी.थ्री (MP3) प्लेयर पण विकत घेतला. पण साध्या गाण्यांनी शेजारणीचा आवाज लपत नाही म्हणून धांगडधिंगा गाणी लावावी लागली. असल्या गाण्यांमुळे माझं कामात आणखीन लक्ष लागेना. म्हणजे आजारापेक्षा उपाय भारी अशी पंचाईत झाली. मी अक्षरशः मोडकळीस आलो होतो. आता कुठल्याही क्षणी तिच्या क्यूबमध्ये जाऊन “कृपया आता फोन आवरता का?” असा शिष्ट उपाय करायला मी तयार झालो होतो. तेवढ्यात एक आनंदाची बातमी मिळाली - तिला प्रमोशन मिळाले.

तिला प्रमोशन मिळाले आणि बढतीचा भाग म्हणून तिची कंपनीच्या दुसऱ्या इमारतीमध्ये बदली झाली. तिला मिळालेल्या प्रमोशनचा तिला जेवढा आनंद झाला नसेल त्याहीपेक्षा चौपटीने जास्त आनंद मला झाला होता. मी योजलेल्या शिष्ट उपायाची आता गरज पडणार नव्हती. उलट मी छान हसऱ्या चेहेऱ्याने तिचे बढतीबद्दल अभिनंदन देखील करून आलो.

ती बोलकी बाई तिच्या नवीन ठिकाणी यथासांग स्थलांतरीत झाल्यानंतर माझा कक्ष कसा निवांत वाटत होता. असेच एक दोन दिवस गेलेत आणि काय मोठा घोर झाला हे माझ्या लक्षात आले. माझ्या बोलक्या शेजारणीमुळे तिच्या मागील कक्षात असणाऱ्या “हसऱ्या” बाईशी कधी संबंधच आला नव्हता. पण आता मात्र तिच्या “हसणे” ह्या आवडत्या कार्यक्रमाने माझी पंचाईत केली. तुम्ही म्हणाल हसण्याने एवढा काय त्रास होतो. अहो पण हसणे कसे? दिवसभर “खिदी खिदी खिदी खिदी” आणि त्याला मोठा लाऊडस्पीकर लावल्यानंतर जो काही कानात कलकलाट होतो तो तुम्हाला अनुभवाशिवाय नाही कळायचा. ही बाई फोनवर, किंवा तिच्या कक्षेमध्ये कुणाशी बोलताना वारंवार “खिदी खिदी” हसून छळ करते. मला तिचे बोलणे ऐकूच येत नाही, फक्त मोठ्या आवाजातील “खिदी खिदी खिदी”! मी एक-दोन वेळा तिथल्या कक्षांच्या ओळीमध्ये जाऊन बघितले सुद्धा की कोण हसतंय ते. अहो तिथे तर चार चार बायकांचा घोळ आहे. त्यापैकी नेमकी कोण हे न ओळखता येणाऱ्या त्या हसऱ्या बाईने सगळ्या शेजारणींना तीच सवय लावली आहे. आता एक हसायची थांबली की दुसरीचं “खिदी खिदी” सुरु होतं. वरून मला ह्या बायांपैकी एकीचंसुद्धा बोलणं ऐकायला येत नाही, त्यामुळे “इंटरेस्टिंग” असं काही सुद्धा कानावर येत नाही. म्हणून माझी जास्तच गोची झाली आहे. पहिलेचीच शेजारणी किती बरी होती आणि तिच्यामुळे माझे काय मनोरंजन व्हायचे याची मला आता आठवण यायला लागली आहे. आता मला पुन्हा ऑफिसात जायला भीती वाटायला लागली आहे.

क्रमश: