अशी वादळे येती - भाग ४: माझं घर शेणाचं

दरवर्षीचा "हरिकेन सीझन" सुरु झाला की आग्नेयी राज्यांत आणि त्यातल्या त्यात फ्लोरिडा राज्यात मोठे वादळ धुमाकूळ घालणार हे शंभर टक्के ठरलेलेच असते. फ्लोरिडा हे निवृत्तीचे ठिकाण मानल्या जाते - म्हणजे अख्खे आयुष्य कर्म करून एकत्र केलेला पैसा घेऊन निवृत्त झालेले अमेरिकन पिकली पानं इथे मस्तपैकी घरं करून राहतात. महावादळाच्या जीवघेण्या रस्त्यामध्ये राहणारी ही "सीनियर" जनता "देवा, संपूर्ण आयुष्य झटून गोळा केलेल्या संपत्तीनेसुद्धा आता मनाला शांती मिळत नाही. तेव्हा लवकरात लवकर कुठले तरी 'हरिकेन (महावादळ)' पाठवून मला घेऊन जा रे बाबा!" म्हणत जीवावर उदार झालेली असावी अशी मला शंका येते. नाहीतर एवढी संपत्ती असल्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी "रिटायर" होण्यापेक्षा जेथे निसर्गाने रणधुमाळी माजवली आहे असल्या मढ्यात राहण्याच्या भानगडीत का बरे पडावे?

या सगळ्यात एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या वादळांना दिलेली नावं. जागतिक हवामान संस्थेची चौथी प्रादेशिक 'हरिकेन कमिटी' अमेरिकेच्या आजूबाजूला निर्माण होणार्‍या वादळांना नावे देण्याचे काम करते. ज्याही वादळाने काही नुकसान पोहोचण्याची शक्यता असते त्याला ओळख देण्यासाठी पुल्लिंगी आणि स्त्रिलिंगी नावे ही आळीपाळीने दिली जातात. अर्थात कुठल्या वादळाला माणसाचे नाव मिळणार की बाईचे हे ठरलेले नसते. कारण एका वर्षात किती वादळे कधी होणार हे देखील माहित नसते. पण गेल्या काही वर्षांत झालेल्या वादळांपैकी मागच्या वर्षीच्या (२००४) 'हरिकेन ज़ान (Jeanne)' मुळे सगळ्यात जास्त लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले, 'हरिकेन फ्रांसेस( Frances)' नी सगळ्यात जास्त 'टोर्नाडो' गुंडं सोबतीला आणले; आणि ह्या वर्षीच्या (२००५) "हरिकेन कटरिना(Katrina)" नी जिवमालाची जी अभूतपूर्व नासधूस केली आहे त्याचा अजून संपूर्ण ठावठिकाणा लागलेला नाही (हा लेख लिहीत असताना). ह्या सगळ्या दुःखद घटना आहेत. पण ज्या महाभयंकर आणि भांडकुदळ वादळांनी ही कामे केली, योगायागाने त्या सगळ्यांची नावे स्त्रिलिंगी कशी हे मात्र मी मराठीमध्ये न लिहिता इंग्रजी मध्ये प्रस्तुत केले असते तर इथल्या अमेरिकन बायकांनी मला जोड्या-चपलांनी फोडून काढले असते (कारण त्या चाबूक ठेवत नाहीत, पण कपाटे मात्र नुसत्या नवनवीन जोड्या आणि चपलांनी भरून ठेवतात)! ह्या वादळांची नावं सध्यातरी फक्त 'रोमन' बायका माणसांच्या नावावरून ठरवली जातात. त्यामुळे यात मराठी हात नाही असे माझे मत आहे. जर तसे असते आणि महाराष्ट्रातील वादळांना आपण अशी नावे दिली असती तर मराठी वृत्तपत्रात बघायला मिळणार्‍या "माधुरीने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली!" ह्या ठळक बातमीचा संबंध कदाचित दीक्षितांच्या पोरीशी आला नसता. सुदैवाने असले नामांकित वादळ हा प्रकार महाराष्ट्रात नाही. हे काम सध्या अमेरिकन बायकांचेच!

सर्वसाधारणतः अमेरिकन जनता ही जरा जास्तच उत्पाती (ऍड्व्हेन्चरस) आहे याबद्दल वाद नाही. असल्या प्रचंड वादळाला तोंड देण्याकरता लोकं लाकडी घरे बांधून राहतात त्याचे मला नवल वाटते. ह्या मनुष्य-निसर्ग समरात कधी कुणाच्या घरावर मोठे वडासारखे झाड आदळून घराचे लाकडी छप्पर फोडून, दुसरा मजला जमीनदोस्त करून आणि पहिल्या मजल्याच्या जमिनीची वाट लावून ते झाड जेव्हा तळघरातच आपले शेवटचे प्राण सोडते तेव्हा ते आपल्यासकट संपूर्ण घराला "मैं डूबूंगा तो तेरे को लेकर ही डूबूंगा" असल्या थाटात देवाघरी घेऊन गेलेले असते, तर कधी टोर्नाडोराव अख्ख्या घरालाच आपला प्रसाद म्हणून खुशाल उडवून नेतात. अशा नैसर्गिक महाधिदेवांसमोर काँक्रीटचे घर बांधण्याऐवजी लाकडाचे घर बांधून "मैने जानबूझके ये लकड़ी का घर बनाया है। तुम क्या करते वो हिम्मत है तो करके दिखावो!" म्हणून उलटे तोंड देणार्‍या अमेरिकन माणसाच्या उर्मटपणाला मात्र मानायलाच पाहिजे! मराठीभूमीतील शहरांत मात्र आपण चांगल्या विटासिमेंटाची घरे बांधून राहातो. भूकंप झाला तर त्या घराचे काय होईल याची तमा न बाळगता निसर्गाच्या वादळशक्तीसमोर मात्र नतमस्तक होऊन (गरज नसताना) मराठी माणूस पावसाला तोंड देण्यासाठी एकदम भक्कम घर तयार करतो. कुठल्या वादळाची बिशाद आहे त्या घराची एक वीटही वेगळी करण्याची? (खरं म्हणजे वादळ बिदळ, पाऊस असल्या गोष्टींसाठी थोडेच घर एवढे मजबूत बांधतो आपण? घरफोडी टाळणे हा मुख्य उद्देश्य असतो ही गोष्ट निराळी!)

मी लहान असताना एक चिऊ आणि काऊ यांची गोष्ट ऐकली होती. त्यात चिऊताई समंजसपणाने मेणाचं घर बांधते आणि कावळा मात्र शेणाचं. काही दिवसांनंतर धो धो पाऊस पडायला लागतो. कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं. पण चिऊचं घर मेणाचं असतं त्यामुळे त्याला काही होत नाही. मायदेशी राहणार्‍या विटासिमेंटाची पक्की घरं असणार्‍या माझ्या बांधवांशी निसर्गाचा एक करार आहे - की माझा तुला त्रास होणार नाही - तुझं घर मेणाचं. वादळाच्या रस्त्यात असणारं माझं सध्याचं अमेरिकेतील लाकडाचं घर मात्र मज वाटे शेणाचं!

समाप्त.

भाग १
भाग २
भाग ३

Comments

Vidya Bhutkar said…
Sarv bhaag ekdamach vachale. Mast lihile aahe.

Popular posts from this blog

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

सावजी

नावात काय आहे?