नावात काय आहे?


नावात काय आहे?

बर्‍याच वर्षांपूर्वी जो कोणी (नक्की कोण हा प्रश्न गौण आहे) हे वाक्य म्हणून गेला, तो म्हणून गेला खरा, पण सगळ्या जगताला एक वादाचा विषय देऊन गेला. मी पुष्कळ वेळा "नावात काय आहे" ह्यावरचा वाद टाळत असतो. कारण "नावात काही नाही" आणि "नावातच सगळे काही आहे" अशा दोन्ही बाजूंनी पटवून देणारे पुष्कळ महाशय असतात.



आमेरिकेत आल्यानंतरच कळले कि यांपैकी कुठ्लीही बाजू घेण्याकरता अनुभव असावा लागतो. कुठलीही बाजू का होईना, ती पटायला स्वतःच्या नावाचा कुणीतरी खेळ केलेला असायला लागतो. तोच खेळ किती तरी वेळा चाललेला असतो या देशात!

माझ नाव पवन. अख्ख्या मराठीत सगळ्यात सोपी अशी "पवन, मदन, नयन" ह्यांच्याशी यमक जुळणारी आणि काना मात्रा नसणारी दुसरी नावे नाहीत. पण अमेरिकन माणसे म्हणा किंवा बाया म्हणा, एक दोन वगळले तर एवढे सोपे नाव बरोबर बोलवून दाखवेल असा एकही जण सापडणार नाही.

ह्या प्रकरणाची सुरवात एका होटेल मॅनेजर पासून झाली. इथे लोकांची नावे "Rachel" ला "रेचल", "Aaron" ला "एरन", "Cary" ला "केरी" अशी उच्चारली जातात. त्याचेच उदाहरण घेउन ह्या माणसाने माझ्या नावाचा "Pawan" च्या ऐवजी "फेवन" म्हणून सम्पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकला. मी अवाक् होऊन त्याच्याकडे बघत राहिलो. "अरे भल्या माणसा, अरे "प" आणि "फे" यामध्ये केवढा फरक असतो आमच्या मराठीमध्ये तुला ठाऊक आहे काय?" असे मला त्याला आवर्जून विचारवेसे वाटायला लागले. उपयोग नाही हे कळून ह्या पहिल्या वहिल्या नावाच्या फडश्याचा काही शोक न करता मी आपल्या वाटेला लागलो.
पुढे ऑफिसमध्ये कित्येक वेळा असल्या विचित्र "व्हेरायट्यांचा" प्रयोग सुरू झाला. कधी कुठल्या मिटींगमध्ये, किंवा कधी टेलि-काँफरंस कॉल्स वरती मस्तपैकी माझ्या नावाचा खेळ सुरु झाला. लोकं नियमितपणे "हेलो पव्हाण" (आपल्या चव्हाणांसारखं) किंवा "हे फावन" (हे ऐकल्यावर मला "मन-भावन" ह्या शब्दाचीच आठवण व्हायची) असल्या संबोधनाने खेळाची सुरुवात होऊ लागली.
कितीतरीवेळा असले प्रसंग आले की बोलणार्‍या अमेरिकन माणसालासुध्दा कळू लागले की आपलं कुठेतरी चुकतंय. मग अशा वेळेस त्याला (किंवा तिला) माझं नाव कसं "प्रोनाऊंस" करायचं हे मी शिकवू लागलो. आता भला मोठा प्रश्न माझ्यासमोर हा उभा होता की त्यांना ते शिकवायचं कसं? कारण आपल्या मराठीतल्या पुष्कळश्या काना मात्रांचा आणि अक्षरांचा अमेरिकन ईंग्रजीमध्ये तसाच उच्चार निघेल असे शब्द बनवणं हे वाटतं त्यापेक्षा अतिशय कठिण आहे. पण शेवटी मी जुळवाजुळव करून एक 'powun" अश्या "स्पेलिंग"चा शब्द शोधून काढला. कुणाला मला विचारावेसे वाटले की 'बाबा तुझं नांव प्रोनाऊंस कसं करायचं' तर मी त्यांना सांगायचो: 'please pronounce the name as if spelt like "p" "o" "w" "u" "n"'. मग तसा उच्चार करताना माझे अमेरिकन सहकारी "पॉवन" च्या जवळ जायचे. त्यातल्या त्यात "फावन, फेवन, पव्हाण" असल्यातरी नावांपासून माझी सुटका झाली. शेवटी ऑफिसमध्ये "पॉवन" हे नाव मला चिकटले आणि मी पावन झालो.

त्यानंतरसुध्दा अधूनमधून वेगवेगळे नावांचे प्रकार बघायला मिळायचे. एका प्रोजेक्ट मॅनेजर बाईने मला ई-मेल पाठवताना "Hello Powun" पासूनच त्या ई-मेलची सुरुवात करायचा निश्चय केला होता. उच्चार करताना powun आणि लिहिताना "Pawan" हे तिला जमायचंच नाही. बरं अमेरिकनांचं एकदा समजू शकतो, पण आपल्या भारतीय लोकांपैकीही काहीजण टेलि-काँफरंस कॉलवरती "फावन" किंवा "पॉवन" असे आपले तोंड साफ करून घ्यायचे तेव्हा मला बरीच चीड यायची.

कायद्याने माझं पूर्ण पहिलं नांव आहे "पवनकुमार". कुठल्याही "कस्टमर सर्विस" ला फोन केल्यानंतर सहाय्या विचारते: "Who am I speaking with?" किंवा "What is your full name, Sir? आता झालं आली पचाईत! त्या बाईला माझं पूर्ण नांव "spell" करून दाखवणं म्हणजे एक तारेवरची कसरतंच असते. मग मी सुरु करतो "P ऍज इन Peter ...... ".
एखाद्या तामिळ मनुष्याने आपले "सूर्यप्रकाशम् रामचंद्रम् मूर्तिनाथन" हे नांव सांगितले तर ही बाई बेशुध्दच पडायची!

माझ्या मित्रांची मुले दोन वर्षांची असताना छान बोलायला लागली. माझ्या एक उत्तर भारतीय हिंदी भाषिक मित्राचा मुलगा मला "ममन चाचू" असं म्हणत असे. तसेच दुसर्‍या एका अगदी जवळच्या मित्राच्या मुलाने आमचा "पयन काका" करून टाकला होता. लहान मुलांचे बोल किती गोड असतात! त्यामुळे त्यांचे कौतुकच वाटत असते. पण मुले मोठी झाली आणि बरोबर "पवन काका" म्हणू लागली तरी सुध्दा घरची मोठी माणसे "पयन काका" वरच अटकलीत! त्यांना कोणी सांगावे?

तर अशी ही अमुच्या नावाची दीर्घ कहाणी. आई बाबांनी नाव ठेवताना किती मायेनी आपले नाव ठेवलेले असते! तेव्हा त्यांच्या मनात हे येत नाही की लोकं त्या नावाचा किती दुरुपयोग करू शकतात. माझा मुलगा किंवा मुलगी ह्या नावाने जाणली जाणार याचंच त्यांना कौतुक असतं. पण दुर्दैवाने त्याच नावाचा लहानपण आणि शाळेत असतानापासून बराच दुरुपयोग चाललेला असतो.

आजकाल एक "ट्रेन्ड" सुरु झालेला आहे. तो म्हणजे नाव छोटे करून त्याला "वेस्टर्नाइज" करण्याचा. चांगली "सिध्दार्थ" नावाची मुलं स्वतःला "सिड्" म्हणवतात, "अर्चना" आपलं "ऍश्" करून घेते आणि "आनंद" आपले नांव "ऍन्डी" म्हणून सांगत फिरतो. मला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं. शेवटी "नावात काय आहे?" या प्रश्नाचं प्रत्येकाने आपापलं उत्तर शोधायचं असतं.

Comments

Nandan said…
Hi Pavan,

I was looking for Marathi blogs online and found yours. I have recently started one blog dedicated to Marathi Literature at http://marathisahitya.blogspot.com/. Do visit it if you find it interesting.
Akira said…
Kharach kachra hoto nahi ka navacha??....Tu nirwanicha paryay niwadlas ki nahi..mhanje navacha apabrhaunsha karun ingraji naav karne..?? ;)

Ankheen ek vicharaycha mhanje...mozilla war marathi font neet disat nahi....nustya rhasva velantyach nahi tar...jodaksharahi neet disat nahit....do you know how to resolve this?
Pawan said…
अकिरा,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

मराठी ब्लॉग विश्व ह्या साईटवरील "Devanagari Font Problem?" ह्या लेखामध्ये फायरफॉक्समध्ये देवनागरी बरोबर कशी दाखवावी ह्याबद्दल उहापोह आहे. तो कामात पडल्यास नक्की कळव!
Anonymous said…
शेवटी तुझं ब्‍लाॅग शोधून काढलं. ऒळखलं मला?
फ़िलाडेल्‍फ़िया...बियरच्‍या बाटल्‍या...सिगरेट.....सावजी चिकन......स्‍प्‍लेन्‍डाची पुरणपोळी....कुंगफ़ू हसल...

Popular posts from this blog

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

सावजी