मी रंगलेला


'सोनेरी केसांनी मढलेली, पिवळी मादक साडी घातलेली, डोक्यात सुंदर पिवळा गुलाब खोचलेला आणि गोरा रंग तिच्या त्या पिंगट अभिव्यक्तीला फिक्का पाडेल अशी काया असणारी अतिशय उन्मादक सौंदर्या ती नुकतीच धबधब्यातनं केसं पुसत बाहेर आली. भान हरपून तिच्याकडे बघत असतानाच मी हात पुढे केला आणि तिला मी उभा असलेल्या प्रचंड शिळेवर येण्यास मदत केली. लगेच कुठूनतरी कुजबुजल्या आवाजात हलकेच आकाशवाणी झाली "...तूर साबुन आपके गोरे रंग को निखारे..". ते सौंदर्य पाहून देव सुद्धा बरळायला लागला होता.


अगदी सुंदर पाण्याचा डोह, कडेला तो अतिउंच धबधबा, सभोवताली सुंदर वनराई, मध्ये गोलाकार मऊ शिळाखंडांच्या माळा आणि निरभ्र आकाश असल्या देखव्यातून मी तिचा हात हातात धरून पळत चाललो होतो. तिथे समोरच हिरवागार गालिचा पसरल्यासारखा सुंदर बगीचा होता. तिथे आम्ही धाप लागून बसतो नं बसतो तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाहाता पाहाता मी मुग्ध होऊन गेलो.

"छलके तेरी आंखोंसे शराऽब औऽर जियादा" हे गीत माझ्या प्राणवायूत शिरल्यासारखे बाहेर पडू लागले. कधी हातात हात घालून तर कधी एकमेकांमागे असे आम्ही बागेत विहरू लागलो. भ्रमंती करता करता आम्ही बागेच्या कडेला पोहोचलो. तिथे बघतो तो काय! एक भली मोठी "स्कायस्क्रेपर" इमारत उभी होती. त्या इमरतीचा सगळ्यात उंच मजला खालून दिसतच नव्हता. सुरुवातीला बागेतून ती इमारत का दिसत नव्हती याचा विचार नं करता आम्ही दोघे मात्र त्या इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत गेलो. कुठल्याका जपान्याची ती इमारत दिसत होती. आतील सजावटही जपानी होती. जपानी किमोनो पोशाख केलेल्या उल्हसित जपानी तरुणी इकडून तिकडे वावरत होत्या. मध्ये असलेल्या उंच दालनाभोवती अख्खे "शॉपिंग कॉंम्प्लेक्स"च होते. ती झटकन् एका कपड्यांच्या दुकानात गडप झाली आणि काही वेळानंतर एका सुंदर किमोनो पोशाखाचा पेहेराव करून बाहेर आली. तिचे रूप जपानी पोशाखातसुद्धा कसे खूलून दिसते हे बघून मी पुन्हा भान हरपलो. "ले गई दिल, गुडिया जापानकी , पाऽगल मुझे कर दिया" ह्याने सुरूवात होऊन "लव इन टोकियो" कधी सुरू झाला ते कळलंच नाही.

आम्ही त्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन आजूबाजूचे दृष्य कसे दिसते हे बघण्याचं ठरवलं. काचेच्या "लिफ्ट" मधून विमानाच्या गतीने वर जाताना काही वेगळीच मजा येत होती. माझा "लव इन टोकियो" अजूनही सुरूच होता. सगळ्यात वर असलेल्या मजल्यावर पोहोचलो तर समोर गच्चीवर एक भली मोठी बागच होती. आश्चर्य करत आम्ही तिथे पाय ठेवतो न ठेवतो तेच माझा हात एका "विद्ये"सारख्या दिसणार्‍या झाडीने खरचटला गेला. मला जबरदस्त खाज यायला लागली. अचानक कुठल्याशा आवाजाने मी दचकलो, "ओऽयेऽ ओऽये". तिने आपल्या पर्समधून एक छोटीशी बाटली काढली होती. "खुजली करनेवाले, B-Tex लगाले" असं म्हणत. मला आता काही तरी गडबड आहे याची शंका यायला लागली होती. पण तरी फारशी चिकित्सा न करता आम्ही पुढे सरकलो.

सिनेमातील एक "प्राण" सारखा दिसणारा मनुष्य हातात बाहुल्या घेऊन कसले तरी उचापती गाणं गात उभा होता: "हम बोलेगा तो बोलेगा के बोलता हैं. हमरा एक पडोसी हैं. नाम जिसका जोशी हैं...." वगैरे त्याचं गाणं सुरू होतं. पुढे बघितलं तर खरोखरच एका जोश्याचं घर तिथे होतं. त्या उंच इमारतीवर ते घर कुठून आले याचा विचारही मला शिवला नाही. जोशी बागेमध्ये त्याच्या कुत्र्याला फिरवायला निघाला होता. त्या कुत्र्याचा रंगं मला काही ठीक दिसत नव्हता. बघता बघता तो कुत्रा जोश्याच्या हातातून सुटून दोन पायांवर चालायला लागला. आहो चालायचा सोडा, आता तर त्याने जॅकीट आणि चक्क "रे बॅन" चा काळा सूर्यचष्मा घातला होता. आणि नंतर नंतर तर तो "देव आनंद" या सिने-कलाकारसारखा हॅन्ड्सम् पण दिसायला लागला. मग देव आनंद त्या कुत्र्यासारखा दिसतो की कुत्रा त्या देव आनंद सारखा दिसतो यातला फरकच मला कळेनासा झाला.

इथपर्यंतं सगळं ठीक होतं. पण हा जोश्याचा कुत्रा की देव आनंद कोण तो, आता चक्क माझ्या प्रेमिकेच्यामागे लागला! "रुक जाना ओ जाना हमसे दो बाते करके चली जाना" वगैरे गाणं म्हणून सरळ त्याने माझ्यासमोर तिला फ्लर्ट करायलाच सुरुवात केली. मला जोश्याच्या कुत्र्याचा भयंकर म्हणजे भयंकर संताप आला होता. त्याला जरा दम द्यावा म्हणून मी काडी घेऊन बाजूच्या मोठ्या वडाच्या झाडावर चढून त्याची खबर घेण्याचं ठरवलं. झाडावर चढलो तर काही गडबड झाल्यासारखं वाटलं. झाड तर व्यवस्थितच होतं. पण काय कुणास ठाऊक मी तिथे गेल्या गेल्या उलटा कसा लटकलो त्याचा मला उलगडा होईना. मान वळवून बाजूला बघितलं तर उडालोच. एक वटवाघूळ अगदी मजेत उलटा लटकून माझ्याकडे बघत मिश्किल हसत होता. मला घाम फुटला!

माझ्याकडे बघत तो वटवाघूळ जोरात हसायला लागला आणि गाणं सुरु केलं "एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया, मेरा क्या कसूर, जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया". माझ्या चेहेर्‍यावर भय आणि विस्मय अशा दोन्ही भावना एकवटल्या होता. अजून कुठली भावना माझ्या भयकापित शरीराच्या दक्षिण भागात एकवटली होती हे सूज्ञांना सांगायची गरज नाही. मला कळेना की हा मला कशाबद्दल एप्रिल फूल बनवतो आहे. हसता हसता आणि गाणे गाता गाता त्या वटवाघूळाने सराईतपणे आपल्या डोक्यावर हात फिरवून आपला वटवाघूळाचा मुखवटा काढला. अहो बघतो तर काय तो जोश्याचा कुत्रा होता!

मला "एप्रिल फूल" करत जोश्याचा कुत्रा सटकन् खाली उतरून पळून गेला. माझा संताप आता अनावर झाला होता. मी कसंबसं स्वतःला सोडवून खाली उतरलो आणि जोश्याच्या कुत्र्यामागे पळालो. कुत्रा केव्हाच गडप झाला होता. कुत्र्याला नंतर बघून घेइन असा निश्चय करून मी त्याचा नाद तूर्तास सोडला. त्या डॅंबिस कुत्र्याने तिचा पिच्छाच पुरवला होता. मला ती हिरवळीवर धाप लागल्यामुळे बसलेली दिसली. मी म्हटलं "चल, आपण चौपाटीवर जाऊन भेळ खाऊ!".

त्यानंतर काही वेळातच आम्ही चौपाटीवर चालत जात होतो. एका ठेलेवाल्यानी मोठ्यामोठ्याने "आनेवाला पल जानेवाला हैं" हे गाणं लावलं होतं. जवळपास सगळीकडेच ते गाणं सुरू होतं. आम्ही मस्तपैकी भेळ वगैरे खाऊन नरिमन पॉईंट वर जाऊन भटकू लागलो. इतक्यात आम्हाला तिथे स्कूटरवरती सुनिलबाबू दिसले. मी त्याना विचारू लागलो "वा सुनिलबाबू, नयी गाडी?". सुनिलबाबू म्हणाले "बढिया हैं". मी सुनिलबाबूंशी आणखी थोडा वार्तालाप केला - म्हणजे बायको कशी आहे, घराला नवीन रंगं मारला वगैरे वगैरे.

संध्याकाळ होता होता आम्ही एका टेनिस कोर्टावर पोहोचलो. तिला टेनिस खेळायची खुमखुमी आली नि आम्ही दोघे टेनिस खेळू लागलो. इथेही काही घॉटाळा दिसत होता. माझ्या हातात टेनिसची रॅकेट होती पण तिच्या हातात मात्र बॅडमिंटनची. मी इकडून टेनिस चेंडू फेकला की तिच्याकडे जाताना तो बॅडमिंटनचे फूल होऊन जाई. तिने "शॉट" मारला की माझ्याकडे येता येता ते फूल टेनिसचा चेंडू होऊन जाई.

एवढ्यात ती गुणगुणायला लागली :"ढल गया दिन , हो गई शाम, जाने दो, जाना हैं". मी म्हटलं "अभी अभी तो आई हो, अभी अभी जाना हैं" आणि म्हटलं की तूच तर खेळ सुरू केला, आता एवढ्या लवकर मी काही तुला जाऊ देणार नाही. तिच्या या विनवण्या चाललेल्या असताना मी मारलेला टेनिसचा चेंडू अचानक अंधारलेल्या हिरवळीमध्ये नाहिसा झाला. मी शोध घेत असताना लक्षात आले की एक सार्वजनिक कुत्रा तो चेंडू आपल्या तोंडात लपवून घेऊन चालला आहे. मी जवळ जाऊन बघितले तर तो तोच बदमाश जोश्याचा कुत्रा होता! माझा राग अनावर झाला. मी आपली रॅकेट त्या कुत्र्याला मारायला म्हणून जोरात त्याच्याकडे फेकली. माझ्या प्रेमिकेला अचानक काय झाले कुणास ठाऊक. ती चक्क कुत्र्याची बाजू घेत "कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को" गायला लागली. हा बदल कसा काय घडला या विचारात असतानाच आवाज आला "मेऽऽऽऽल्याऽऽऽऽ" आणि कुठूनतरी भर्कन् एक लाटणं आलं आणि त्या कुत्र्याच्या पोटकाडीत बसलं. ते कुत्र जोराने केकाटून "म्यांऊ म्याऊं" ओरडायला लागलं. लगेच बरीचशी भांडी आदळायचा कान ठोठावणारा आवाजही झाला'

मी खाड्कन् डोळे उघडले. बघतो काय तर आमच्या हिने चोरून दूध पिणार्‍या बोक्याचा चांगलाच समाचार घेतला होता. बोक्याने "म्यांऊ म्यांऊ" ओरडत स्वयंपाक घरातून आमच्या झोपण्याच्या खोली मध्ये शिरून शय्येला लागून असणार्‍या खिडकीमधून काढता पाय घेतला होता. समोरचा टीव्ही सुरुच होता. त्यावर रविवार सकाळचा "रंगोली" कार्यक्रम सुरू होता. त्यावर 'लैला मजनू' पिच्चरचं "कोई पत्थर से ना मारो.." गाणं सुरू होतं. त्या रंगोली कार्यक्रमाने त्यातील जाहिरातींसकट माझ्या साखरझोपेची पार वाट लावली होती.

Comments

Popular posts from this blog

ऑफिस - भाग २ : तेलुगु देसम

सावजी

नावात काय आहे?