मी रंगलेला
'सोनेरी केसांनी मढलेली, पिवळी मादक साडी घातलेली, डोक्यात सुंदर पिवळा गुलाब खोचलेला आणि गोरा रंग तिच्या त्या पिंगट अभिव्यक्तीला फिक्का पाडेल अशी काया असणारी अतिशय उन्मादक सौंदर्या ती नुकतीच धबधब्यातनं केसं पुसत बाहेर आली. भान हरपून तिच्याकडे बघत असतानाच मी हात पुढे केला आणि तिला मी उभा असलेल्या प्रचंड शिळेवर येण्यास मदत केली. लगेच कुठूनतरी कुजबुजल्या आवाजात हलकेच आकाशवाणी झाली "...तूर साबुन आपके गोरे रंग को निखारे..". ते सौंदर्य पाहून देव सुद्धा बरळायला लागला होता. अगदी सुंदर पाण्याचा डोह, कडेला तो अतिउंच धबधबा, सभोवताली सुंदर वनराई, मध्ये गोलाकार मऊ शिळाखंडांच्या माळा आणि निरभ्र आकाश असल्या देखव्यातून मी तिचा हात हातात धरून पळत चाललो होतो. तिथे समोरच हिरवागार गालिचा पसरल्यासारखा सुंदर बगीचा होता. तिथे आम्ही धाप लागून बसतो नं बसतो तेवढ्यात तिच्या डोळ्यात पाहाता पाहाता मी मुग्ध होऊन गेलो. "छलके तेरी आंखोंसे शराऽब औऽर जियादा" हे गीत माझ्या प्राणवायूत शिरल्यासारखे बाहेर पडू लागले. कधी हातात हात घालून तर कधी एकमेकांमागे असे आम्ही बागेत विहरू लागलो. भ्रमंती करता करता...